कोरेगाव भिमासाठी पीएमपीच्या १५१ बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:12 PM2018-12-21T12:12:01+5:302018-12-21T12:19:58+5:30
गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे.
पुणे: कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला येत्या १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यास येणा-या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुणे व शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील ३० किलोमीटर पर्यंतची वाहतूक वळविली जाणार आहे.गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे.तसेच विविध विभागांकडून आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री गिरीश बापट यांंच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,आमदार बाबुराव पाचर्णे , जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पोलीस आयुक्त के व्यंकटेशम,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ७ ते १० लाख नागरिक येतील,असे गृहित धरून जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षेसह आवश्यक सोई-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत दिली. त्यामुळे पुण्यातून कोरेगाव भिमा येथे जाणा-या आणि नगर रस्त्याने येणा-या नागरिकांसाठी शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यातील काही गाड्या शटल म्हणून वापरल्या जाणार आहेत.तसेच खासगी वाहनांसाठी ११ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पीएमपी बसेससाठी पेरणे ग्रामपंचायतीने एक एकर जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.शिरूर तालुक्यात ५ आणि हवेली तालुक्यात ६ ठिकाणी नागरिकांना पार्किगची सोय करण्यात आली असून येथे एक हजाराहून अधिक चारचाकी वाहाने बसू शकतात.
पोलीस प्रशासनाने मागील वर्षा झालेली दंगल लक्षात घेवून गेल्या वर्षापेक्षा दहा पटीने पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.त्यानुसार ५ हजार पोलीस १२ हजार होमगार्ड,एसआरपीएफच्या १२ तुकड्या आणि ४०० स्वयंसेवक यांच्या मदतीने कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे.विजयस्तंभ परिसरात कोणत्याही चूकीच्या वस्तू जाऊ नयेत,यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट लावले जाणार आहेत.तसेच पोलिसांची परवानगी घेतल्या शिवाय कोणालाही या परिसरात स्टॉल लावता येणार नाहीत,असे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.
..................
गेल्या २ महिन्यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, कोरेगाव-भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संपर्क साधून बैठकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आला आहे. स्वच्छता,१०० पिण्याचे टँकर ,३६० फीरते शौचालये, विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, खाद्यपदार्थांचे दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्नीशमन यंत्रणा आदी बाबत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे,असे नवल किशोर राम यांनी सांगितले.कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागातून नागरिक येणार आहेत.त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही,या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपायोजना केल्या आहेत.प्रत्येक अधिकारी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल,याबाबत याची मला खात्री आहे.शासनाकडून 2 कोटी देण्याचे मान्य केले आहे. तसेच निधीची कमतरता भासली तर जिल्हा नियोजन समितीतून दिला जाईल,असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,तसेच विजयस्तंभाजवळ कायमस्वरूपी पाण्याची टाकी,हॉल आवश्यक बैठक व्यवस्था असावी यासंदर्भातील प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल,असेही बापट यांनी नमूद केले.