पीएमपी प्रशासनाने घेतला दुर्घटनांचा धसका ; बस तपासणीच्या कामाला सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:44 AM2019-02-13T11:44:41+5:302019-02-13T11:50:06+5:30
त्येक एक ते दीड महिन्याला पीएमपीची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही.
पुणे : बसला सातत्याने आग लागणे, ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने बसचे ऑडिट करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक आगारात पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दररोज बसची तपासणी करत आहे. त्यामुळे या घटना भविष्यात कमी होतील, अशा आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पीएमपी च्या ताफ्यात दोन हजारांहून अधिक बस आहेत. त्यापैकी सुमारे १४०० बस पीएमपीच्या मालकीच्या तर उर्वरीत बस ठेकेदारांकडील आहेत. प्रत्येक एक ते दीड महिन्याला पीएमपीची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपीकडून यापुर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. दररोज किमान १५० बस बंद पडत आहेत. त्यामुळे दररोज ४५०० ते ५ हजार बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच आरटीओकडूनही अनफिट बसवर कारवाई सुरू केली आहे.
हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सर्व १३ आगारात एकुण पाच अधिकारी व अभियंत्यांची टीम तयार केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक आगारातील बसची टप्प्याटप्याने पाहणी केली जात आहे. त्यासाठी त्यांना प्रशासनाकडून कोणत्या बाबी तपासयाच्या याची यादीच दिली आहे. त्यानुसार प्रत्येक बसमधील या बाबी तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये वायरींग व इंजिनशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत. तसेच ब्रेक, क्लच, गिअर बॉक्स, आसनांसह इतर आवश्यक गोष्टींचेही ऑडिट केले जात आहेत. चालकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारेही बसची तपासणी केली जात आहे. त्यानुसार आवश्यक सुटे भाग बदलले जात आहेत. हे ऑडिट टप्प्याटप्याने केले जात आहे. त्यामुळे बसला आग लागणे किंवा ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
प्रत्येक आगारात एक स्वतंत्र समिती आहे. तसेच सर्व समित्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र समितीही आहे. ही समिती प्रत्येक आगाराचा आढावा घेत आहे. त्यानुसार तपासणी करून कोणते भाग बदलायचे, दुरूस्त करायचे याचा निर्णय समिती घेत आहे.
- नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ