बस रस्त्यात बंद ; पाेलिसांनी ठाेठावला पाच हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:28 PM2019-06-03T16:28:47+5:302019-06-03T16:29:46+5:30
मार्गात बंद पडून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या पीएमपी बसला वाहतूक पाेलिसांकडून पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे.
पुणे : रविवारी दुपारी दाेनच्या सुमारास सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात तीन पीएमपी बसेस बंद पडल्याने वाहतूक काेंडी झाली हाेती. या बसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. अशातच बराचवेळ पीएमपी बस मार्गातून हडविण्यात न आल्याने भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय धुमाळ यांनी पीएमपीएल कडून आँनलाईन ५००० रुपये दंड वसूल केला.
पीएमपी बस रस्त्यात सातत्याने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. जुन्या बसेसमुळे तसेच वाढत्या तापमानामुळे या बसेस बंद पडत आहेत. रविवारी दुपारी दाेनच्या सुमारास तीन पीएमपी बसेस सातारा रस्ता येथे बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. कात्रज परिसरात प्राणी संग्रहालय असल्याने रविवारी या भागात शहर तसेच राज्यातील इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या माेठी असते. अशातच मार्गात बसेस बंद पडल्याने वाहनचालकांना उन्हात तासभर अडकून पडावे लागेल.
पुण्यात वाहतूक पाेलिसांकडून नियम माेडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत असताे. ज्या बसेस बंद पडल्यानंतर काही वेळात मार्गावर हटविण्यात येणार नाही त्यांच्यावर दंड करण्यात येईल असे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी जाहीर केले हाेते. रविवारी बंद पडलेल्या पीएमपी बसपैकी एक पीएमपीची बस वेळेत बाजूला न घेतल्याने वाहतूक पाेलिसांनी या बसला पाच हजारांचा दंड ठाेठावला. या आधी देखील मार्गात बंद पडलेल्या बसवर वाहतूक पाेलिसांकडून दंड ठाेठावण्यात आला हाेता. तसेच पीएमपी बसेस मार्गात बंद पडणार नाहीत तसेच बंद पडल्यास ती मार्गातून लवकर बाजूला करावी असे वाहतूक पाेलिसांकडून पीएमपीला सांगण्यात आले आहे.