PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:13 IST2025-02-26T10:12:37+5:302025-02-26T10:13:03+5:30
- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!
- अंबादास गवंडी
पुणे : रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे; परंतु पीएमपी बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जाते. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस उभी करणे, धोकादायक पद्धतीने बस चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६०२ बसचालकांवर गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून, १४ लाख १७ हजार ६५० इतके दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही पीएमपी चालकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
वाढत्या वाहनांमुळे पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. यामध्ये चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. अशा खासगी वाहनचालकांवर वाहतूक पोलिस ‘सीसीटीव्ही’ तपासून कारवाई करतात. अनेकवेळा पीएमपी बसचालक बेदरकारपणे बस चालवतात. या बस सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या केल्या जातात; तसेच या बसच्या चालकांकडून सर्रासपणे सिग्नल तोडले जातात. बस थांब्यावर उभी न करता ती रस्त्यामध्ये उभी केली जाते. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच या बसवरील चालकांकडून नियमभंगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शिवाय तक्ररी वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ तपासून नियम मोडणाऱ्या पीएमपी बसवर कारवाई केली जाते.
कडक कारवाईची गरज
गेल्या तीन वर्षांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६०२ बसवर कारवाई केली आहे. त्यांना १४ लाख १७ हजार ६५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तरीही ‘पीएमपी’च्या चालकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. कारण, केलेली कारवाई ही खूपच कमी आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या पीएमपी चालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
कारवाई दृष्टिक्षेपात
वर्ष २०२२-२३ मध्ये ७२३ जणांवर कारवाई केली असून, तीन लाख ६१ हजारांचा दंड केला आहे. २०२३-२४ मध्ये १,००२ जणांवर कारवाई केली असून, सहा लाख पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ८७७ जणांवर कारवाई केली असून, ९ लाख ९१ हजार ६५० रुपयांचा दंड केला आहे.
चालकांकडून केला जातो दंड वसूल
नियम मोडणाऱ्या पीएमपी चालकांवर दंडाची कारवाई केल्यानंतर पीएमपी प्रशासन बसचा चालक कोण होता, याची माहिती काढते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम चालकाच्या पगारातून कमी करून घेतली जाते.
अशी आहे आकडेवारी
वर्ष - कारवाई -संख्या दंड वसूल
२०२२-२३ -७२३ - ३ लाख ६१ हजार
२०२३-२४- १,००२ - ६ लाख ५ हजार
डिसेंबर -२०२४ - ८७७ - ९ लाख ९१ हजार
(अखेरपर्यंत)
बसचालकांनी बस संचलनात वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. ज्या बसचालकांवर दंड आकारण्यात आला आहे, ते दंड त्यांच्या पगारातून वसूल केला जाईल. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. - नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी