सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:10 PM2024-11-29T12:10:30+5:302024-11-29T12:11:47+5:30

निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता

PMP bus drivers will be fined Rs 1,200 for breaking the signal; Action against two drivers in two days | सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई

सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड; दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई

पुणे : पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. बस चालविताना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आले असून, आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे.

पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसवरील चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी व सूचना प्राप्त होत आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने बस चालविताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धूम्रपान करणे, मार्ग बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे या तक्रारींचा समावेश आहे.

चालक-वाहकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने पीएमपीकडून चालक-वाहकांना सूचना देण्यात आली आहेत. बस चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, धूम्रपान करू नये, बसेस रस्त्यात उभ्या न करता बस स्टॉपवर उभ्या कराव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करावे, भरधाव वेगाने बसेस चालू नये, अशा विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता चालक आणि वाहक नियमांचे पालन करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चालक आणि वाहकांना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालक-वाहकांवर दंड आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. प्रवासांच्या तक्रारीवरून आतापर्यंत दोन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक पीएमपी.

इथे करा तक्रार

पीएमपी बसमध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी, तसेच बसच्या अवस्थेबाबत, स्वच्छतेबाबत, चालक-वाहकांची वर्तणुकीबाबत, सिग्नल तोडणे यांसह अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन बसचालकांकडून झाल्यास, किंवा बस या सर्व तक्रारी पीएमपीने उपलब्ध केलेल्या टोल फ्री क्रमांकावर कराव्यात. याकरिता ०२०-२४५४५४५४ हा टोल फ्री क्रमांक आहे. तसेच, ट्विटर एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक या पीएमपीच्या समाज माध्यमावरही फोटो, व्हिडीओ, बस क्रमांक (पाटीवरील मार्गाचे नाव), घटना घडलेल्या वेळेची माहिती देत, तक्रार करावी, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

Web Title: PMP bus drivers will be fined Rs 1,200 for breaking the signal; Action against two drivers in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.