पीएमपी बसला आग, चालकामुळे प्रवाशांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:18 AM2018-12-18T02:18:43+5:302018-12-18T02:19:27+5:30
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर रस्त्यावरून बस क्रमांक २९१ कात्रजहून हडपसरला जात होती. त्या वेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते.
हडपसर : रामटेकडी येथील एसआरपी गेटसमोर कात्रज-हडपसर या धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. सुरुवातीला धूर आल्याने आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे सगळ्या प्रवाशांना बसमधून उतरवले.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर रस्त्यावरून बस क्रमांक २९१ कात्रजहून हडपसरला जात होती. त्या वेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. आधी बसमधून धूर येत होता. थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बसच्या डाव्या बाजूचा तयार फुटल्याने मोठा आवाज आला. बसला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे पुढील प्रकार टळला. मात्र, आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकाराची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आले. या वेळी शिवाजी चव्हाण, दत्तात्रय चौधरी, तांडेल शेलार, सखाराम पवार यांनी थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.