पीएमपीची बसस्थानके असुविधांचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 09:29 PM2018-04-17T21:29:40+5:302018-04-17T21:29:40+5:30
‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
पुणे : बसस्थानकांवर प्रवाशांच्या मुलभूत गरजांकडेही पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून दुर्लक्ष केले जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या ७० मुख्य बसस्थानकांपैकी मोजक्याच स्थानकांवर पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह उपलब्ध आहे. तर प्रथमोपचार पेटी आणि अग्निशमन यंत्रणा एकाही स्थानकावर नसल्याचे समोर आले आहे.
‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. परंतु पीएमपी प्रवासी मंचचे रुपेश केसेकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पीएमपी प्रशासनाने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. एकुण ७० स्थानकांपैकी केवळ ३४ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तर २८ स्थानकांवर स्वच्छतागृह आहेत. त्यातील बहुतेक स्वच्छतागृह दोन्ही महापालिकेची आहेत.
प्रवाशांना ये-जा करणाºया बसेसची माहिती व्हावी यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आवश्यक असते. पण फक्त १० स्थानकांवरही उद्घोषणा करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापार्श्वभुमीवर बसेससह स्थानकांवरही अग्निशमन यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही दक्षता घेतली जात नाही. बसेसमध्ये ही यंत्रणा बसविली जात असताना स्थानकांकडे डोळेझाक केल्याचे दिसते. एकाही बसस्थानकावर ही यंत्रणा नसल्याचे उत्तर पीएमपी प्रशासनाने दिले आहे. प्रथमोपचार पेटी तसेच मोबाईल चार्जिंगची सुविधाही या स्थानकांवर नाही. दररोज लाखो प्रवाशांना सेवा पुरविणाºया पीएमपीकडून सोयी-सुविधा देण्यात सातत्याने अपयश येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-------------
बसस्थानकांवरील सुविधांची स्थिती
सुविधा बसस्थानके
पिण्याचे पाणी ३४
स्वच्छतागृहे २८
ध्वनीक्षेपक यंत्रणा १०
अग्निशमन यंत्रणा ००
प्रथमोपचार पेटी ००
मोबाईल चार्जिंग पॉईंट ००
-------------------------