Pune: पुण्यात प्रवाशांसह पीएमपी बसची चोरी; मद्यधुंद चालकाचे थरारक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:36 AM2023-06-19T10:36:43+5:302023-06-19T10:49:23+5:30

पुणे स्टेशन डेपाेतून पळविलेल्या बसला अपघात...

PMP bus with passengers stolen in Pune; Drunk Driver's Thrilling Act | Pune: पुण्यात प्रवाशांसह पीएमपी बसची चोरी; मद्यधुंद चालकाचे थरारक कृत्य

Pune: पुण्यात प्रवाशांसह पीएमपी बसची चोरी; मद्यधुंद चालकाचे थरारक कृत्य

googlenewsNext

हडपसर (पुणे) : मद्यधुंद चालकाने पुणे स्टेशन डेपाेमधील पीएमपी काढून ती हडपसर परिसरातील काळेपडळ परिसरात आणली. येथील फराटे चाैकाजवळील रेल्वे क्राॅसिंगजवळ येताच गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने नेल्यामुळे गाडीला अपघात घडला. मात्र, बसचालक मद्यधुंद असल्याचा प्रकार लक्षात येताच गाडीतील दाेन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत गाडीवर ताबा मिळवला आणि गाडी बाजूला घेतल्यामुळे माेठा अनर्थ टळला.

मद्यधुंद वाहनचालक हा कंत्राटी तत्त्वावर पीएमपी चालवताे. दाेन दिवसांपूर्वी ताे मद्यधुंद अवस्थेत असताना पुणे स्टेशन डेपाेमध्ये उभी असलेली गाडी बाहेर काढली आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणली. दरम्यान, गाडीत दहा-बारा प्रवासी बसले हाेते. काळेपडळमधील फराटे चाैकातील रेल्वे क्राॅसिंगजवळ येताच त्याने गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेतली. दरम्यान, चालक मद्यधुंद आहे, हे गाडीत असलेल्या गणेश काळसाईत, मयूर बोराडे या दोन तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीचे स्टेअरिंग ताब्यात घेतले आणि गाडी थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) हडपसर परिसरात घडला. दरम्यान, सर्व प्रवासी उतरत असताना वाहनचालक पळून गेल्याचे गाडीतील तरुणांनी सांगितले.

डेपाे मॅनेजर म्हणतात, गाडी कंत्राटदाराची!

दहा ते बारा प्रवासी घेऊन पुणे स्टेशनच्या डेपाेची गाडी एक मद्यधुंद वाहनचालक पळवून आणताे आणि अपघातास कारण ठरताे. याबाबत स्थानिक नागरिकांना घेऊन शिवसेनेचे नितीन गावडे यांनी डेपाे मॅनेजर आत्तार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ही गाडी आणि वाहनचालक कंत्राटदाराचे आहेत. त्यामुळे या बसविषयी आणि वाहनचालकाविषयी आपण काही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

कंत्राटदार म्हणताेय, वाहनचालकाने बस चाेरली!

ही बस ज्या कंत्राटदाराने पुरवली, त्याला याबाबत विचारणा केली असता, ही बस पार्क केलेली असताना बसचालकाने ती चाेरून नेली आणि हडपसरमध्ये तिचा अपघात झाला.

‘लाेकमत’चे तीन प्रश्न

१. पीएमपी ही वाहतूक सेवा पुरवते, तिच्या विश्वासावरच पुणेकर बसप्रवास करतात. अशा परिस्थितीत कंत्राटावरील बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस रस्त्यावर आणताे, त्यात प्रवाशांना घेताे आणि अपघात करताे, याबाबत पीएमपी प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का?

२. वाहनचालकाने बस चाेरून नेली असे म्हणत असेल, तर बसचाेरीची तक्रार कुठेही का केली नाही?

३. या प्रकरणात पीएमपी प्रशासन, कंत्राटदार दाेघेही अंग झटकताहेत, मग नेमकी जबाबदारी काेणाची?

अशा बेदरकार व बेजबाबदार वाहनचालकांमुळे आणखी किती दुर्घटना घडणार आहेत, यास जबाबदार कोण? या घटनेस संबंधित सर्व दोषींवर पीएमपी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- नितीन गावडे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: PMP bus with passengers stolen in Pune; Drunk Driver's Thrilling Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.