गरोदर महिलेसाठी पीएमपी थेट रूग्णालयात; चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे मिळाली तात्काळ मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:30 PM2020-04-10T16:30:03+5:302020-04-10T16:30:41+5:30
१०८ वर कॉल करूनही रूग्णवाहिका नाही उपलब्ध
पुणे : भरदुपारी गरोदर महिला रस्त्यातून चालत होती. पण तिला अचानक चक्कर येत होती. तेव्हा तिथून पीएमपी जात होती. चालकाने ते पाहिले आणि लगेच त्यांना पीएमपीमध्ये बसवून थेट कमला नेहरू रूग्णालयात नेले. त्यामुळे त्या महिलेवर वेळेत आणि लवकर उपचार करणे शक्य झाले. पीएमपीच्या चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे लगेच मदत झाली.
ही घटना आज ( शुक्रवारी दि. १०) रोजी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) येथे घडली. आपल्या नोकरीची पर्वा न करता कोणतेही वरिष्ठ आदेशाची वाट न पाहता त्वरित मदत केली.
माणिक बाग परिसरात एक गर्भवती महिला भर उन्हात दुपारी १२:३० वा.चक्कर येत होती. तेव्हा नांदेड सिटी ते डेक्कन मार्गे पीएमपी प्रवासी घेऊन जात होती. बस मधील चालक फिरोज खान व वाहक विजय रामचंद्र मोरे यांनी बस मधील प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर महिलेस बसमध्ये बसविले. आणि बस थेट कमला नेहरु रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केली. या चालक-वाहकाच्या या कायार्चे कौतुक होत आहे.
चालक यांनी डेपो मँनेजर सतीश गाटे यांच्याशी फोनवर संपर्क साधून या बाबत माहिती दिली होती. गाटे यांनी देखील महिलेला मदत करण्यासाठी बसचा मार्ग बदलण्याची परवानगी दिली.
---------------------------------------
१०८ वर कॉल करूनही रूग्णवाहिका नाही उपलब्ध
गरोदर महिलेने १०८ या तातडीच्या रूग्णवाहिकेला दोन-तीनदा फोन केला होता. पण त्यांची रूग्णवाहिका आली नाही. उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात होते. जर अशा तातडीच्या वेळेत योग्य वाहन नाही मिळाले, तर रूग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे तातडीच्या सेवेसाठी मुबलक वाहन असणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
--------------------
मी पीएमपी चालवत असताना ती गरोदर महिला चक्कर येत होती. त्यांनी १०८ नंबरवर काँल केला होता. पण रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले जात होते. म्हणून आम्ही बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली आणि
महिलेला रूग्णालयात नेले. - फिरोज खान, पीएमपी चालक