जाहिरातीच्या उत्पन्नाचा पीएमपीकडे नाही हिशेब
By admin | Published: October 11, 2014 06:45 AM2014-10-11T06:45:42+5:302014-10-11T06:45:42+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रत्येक बसवर वेगवेगळ्या जाहिराती करण्यात आलेल्या असतात, पीएमपीच्या मोठ्या उत्पन्नाचा या जाहिराती एक भाग आहेत.
दीपक जाधव, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रत्येक बसवर वेगवेगळ्या जाहिराती करण्यात आलेल्या असतात, पीएमपीच्या मोठ्या उत्पन्नाचा या जाहिराती एक भाग आहेत. मात्र, अडीच वर्षांपासून जाहिरातीतून किती उत्पन्न मिळाले, याची माहितीच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर खुद्द पीएमपीनेच माहिती अधिकारांतर्गत दिले आहे. तसेच, जाहिरातीची थकीत बिले किती राहिली आहेत, याचीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
जाहिरातीमधून पीएमपीला किती उत्पन्न मिळते, याची विचारणा माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी केली. याबाबत अभिलेखावर माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे.
पीएमपीवर लावण्यात येत असलेल्या खासगी व सरकारी जाहिराती यामधून १ जानेवारी २०१२ ते १ जुलै २०१४ या काळात किती उत्पन्न मिळाले, याची तपशीलवार माहिती मिळावी. जाहिरातधारकांनी २००५ पासून किती बिले थकवली आहेत, तसेच आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आलेला आहे, याविषयी पीएमपीकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावर ही माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही, असे एकच उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले आहे. पीएमपीच्या बसवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातीचा ठेका अॅडक्राफ्ट आऊट डोअर मीडिया प्रा. लि. यांना करारानुसार दिले आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या या उत्तरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पीएमपीने उत्पन्नाचा हिशेब ठेवला नसेल, तर आतापर्यंत त्यांचे आॅडिट झालेले नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.