PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:02 IST2021-10-07T19:02:13+5:302021-10-07T19:02:20+5:30
मोटारचालकासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण
धनकवडी : मोटारचालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना पुणे - सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात घडली. याप्रकरणी मोटारचालकासह साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत पीएमपी चालक सुधीर कागदे (वय ३७ वर्षे,रा. कात्रज) जखमी झाले असून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीएमपी बस सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून निघाली होती. आरोपींनी बालाजीनगर परिसरातील अहिल्यादेवी चौकात बीआरटी मार्गात मोटार आडवी घातली. त्यानंतर मोटारचालक आणि साथीदारांनी वाद घालण्यास सुरूवात केली. आरोपींनी पीएमपी चालक कागदे यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. या घटनेत कागदे जखमी झाले. मोटारचालक आणि साथीदार तेथून पसार झाले. सरकारी कामात अडथळा तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मदने तपास करत आहेत.