पीएमपी चालकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:13+5:302021-07-12T04:09:13+5:30

पुणे : पीएमपी चालकाला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून चेहरा विद्रूप करून मृतदेह हांडेवाडी परिसरात टाकून दिल्याचा धक्कादायक ...

PMP driver brutally murdered | पीएमपी चालकाचा निर्घृण खून

पीएमपी चालकाचा निर्घृण खून

Next

पुणे : पीएमपी चालकाला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून चेहरा विद्रूप करून मृतदेह हांडेवाडी परिसरात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली असून लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

गौतम मच्छिंद्र साळुंखे (रा. पापडे वस्ती, ढमाळवाडी, फुरसुंगी) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे.

गौतम साळुंखे हे २०२० मध्ये पीएमपीमध्ये चालक म्हणून नोकरीला लागले होते. त्यांचे सासरे देखील पीएमपीमध्ये चालक होते. गेल्याच महिन्यात ते सेवानिवृत्त झाले. शनिवारी दुपारपाळी असल्याने ते दुपारीच कामासाठी आपली दुचाकी घेऊन बाहेर पडले होते. स्वारगेट ते धायरी या पीएमपी बसवर त्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट डेपोत बस जमा करून ते घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु, रविवारची सकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या सासऱ्र्यांनी स्वारगेट डेपोत जाऊन चौकशी केली. तेथे गौतम रात्रीच घरी गेल्याचे समजले.

दरम्यान, हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, हांडेवाडी येथे एक मृतदेह सापडल्याचे समजल्यावर पोलीस घटनास्थळी गेले. मृतदेहाचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. आजूबाजूला शोध घेतला असता तेथे पीएमपीचा बॅच मिळाला. त्यावरून गौतम यांची ओळख पटली. त्यांच्या नातेवाईकांनी गौतम यांची ओळख पटवली.

गौतम यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे मोकाशी यांनी सांगितले.

गौतमचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याला सव्वा वर्षाची मुलगी आहे. तो आपल्या सासऱ्यांकडेच राहायला होता. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: PMP driver brutally murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.