पीएमपी चालकाची मुजाेरी ; ज्येष्ठ नागरिकांना दिली दात पाडण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 04:26 PM2018-09-19T16:26:13+5:302018-09-19T21:21:48+5:30
ज्येष्ठ नागरिकांना दाद पाडण्याची धमकी देऊन त्यांना घाबरविण्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे.
पुणे : पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अाधीच सक्षम नसताना पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्यामुळे नागरिकांना अधिकच मनस्तापाला सामाेरे जावे लागत अाहे. अप्पा बळवंत चाैक येथून सांगवीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यावरुन ज्येष्ठ नागरिक अाणि बस चालकामध्ये वाद झाल्याने बस चालकाने ज्येष्ठ नागरिकांना दात पाडण्याची धमकी दिली. तसेच अनेकदा बसचे जाेरात ब्रेक दाबून जेष्ठ नागरिकांना घाबरविण्याचा धक्कादायक प्रकार घडला अाहे.
हा प्रकार मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. महापालिका भवन येथे ज्येष्ठ नागरिक शरद महाजन( वय 78) अाणि सुधा महाजन (वय 76) हे पतीपत्नी सांगवीच्या बसची वाट पाहत उभे हाेते. बस अाल्यानंतर या दाेघांना बसमध्ये चढण्यास वयाेमानामुळे काहीसा उशीर झाल्याने बसचालक अाणि या दाेघांमध्ये वाद झाले. सुधा महाजन यांच्या कंबरेची दाेन वर्षापुर्वी शस्त्रक्रीया झाल्याने चालताना त्रास हाेताे, तसेच वयाेमानामुळे पटपट चालता येत नसल्याचे चालकाला सांगितले. परंतु चालकाने कुठलिही सहानभूती न दाखवता तसेच त्यांच्या वयाचा विचार न करता दाेघांना अर्वाच्य भाषेत भिवीगाळ केली. तसेच बसचा जाेरात ब्रेक दाबून दात पाडण्याची धमकी सुद्धा दिली. नुसती धमकीच नाही तर चालकाने अनेकदा जाेरात ब्रेक दाबून या दाेघांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पती-पत्नीने अापल्या मुलाला बसस्टाॅपवर बाेलवून घेतले. सांगवीच्या शेवटच्या बस स्टाॅपला निलेश महाजन यांनी बसचालकाला पुन्हा अशा प्रकारे न वागण्याची विनंती केली. घडलेला प्रकार भीतीदायक असल्याने सुधा महाजन यांनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना पत्र लिहून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली अाहे.
या घटनेविषयी निलेश महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दादागिरीची असून बसचालकाची शिवीगाळ करत दात पाडण्याची धमकी देण्याची मजल जातेच कशी? अशा बसचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी. अशा गुंडगिरी प्रवृत्तीमुळे पीएमपीएमएलचे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो व प्रवासी संख्या घटते.
दरम्यान या प्रकरणी दाेन्ही पक्षांचे म्हणणे एेकून याेग्य ती कार्यवाही करणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात अाले अाहे.