PMPML: पीएमपी चालकच विचारतात, 'पॅनिक बटण' म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:15 AM2022-09-21T10:15:38+5:302022-09-21T10:15:49+5:30
महिलांची सुरक्षा रामभराेसे : ‘लोकमत’ने केलेल्या ‘पीएमपी’मधील पाहणीतून स्पष्ट
मानसी जोशी/किमया बोराळकर
पुणे : महिलांना सुरक्षित वाटावे, अनुचित प्रकार घडू नये यासाठी बसमध्ये पॅनिक बटण बसवले जाते. प्रत्यक्षात हे बटण कार्यरतच नाहीत. धक्कादायक म्हणजे पीएमपी वाहन चालकांनाच याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित प्रवाससेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने विविध उपाययाेजना केल्याही, मात्र प्रत्यक्षात त्या नावालाच असल्याचे ‘लाेकमत’च्या पाहणीतून आढळून आले आहे.
बटण फक्त शाेसाठी
प्रवासी महिलांना असुरक्षित वाटल्यास, सहप्रवाशांकडून कोणतेही गैरकृत्य होत असल्यास त्यांच्या मदतीसाठी ‘पॅनिक बटण’चा वापर करता येईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात येते. बटण दाबताच त्याची माहिती चालकाला मिळेल आणि तो बस थांबवेल, असा या पॅनिक बटणामागचा तर्क होता. मुळात हे पॅनिक बटणच फक्त शोसाठी असल्याचे दिसून आले आहे.
वास्तव काय?
- मुळात पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या अनेक महिला, मुलींना या बटणासंदर्भात कोणतीही माहितीच नाही. त्यामुळे या बटनाचा वापर झालेला दिसत नाही.
- विशेष म्हणजे या पॅनिक बटणाचा उपयोग कशासाठी आहे, हे पीएमपीच्या चालक, वाहकालाही माहीत नसल्याचे समोर आले आहे.
- रात्री लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना महिला घाबरतात किंवा प्रवासाआधी दहा वेळा विचार करून मगच बाहेर पडतात. सुरक्षेच्या उपाययोजना नावालाच असतील तर महिलांनी नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
''प्रत्येक पीएमपीमध्ये कॅमेरे असावेत. एका बसमध्ये मोजक्या संख्येने प्रवासी येऊ द्यावेत. जेणेकरून गर्दी जेवढी कमी राहील, तेवढे गैरकृत्यांचे प्रमाण थांबतील. पीएमपी प्रशासनाने हेल्पलाइनबद्दल महिलांना संपूर्ण माहिती द्यावी. महिलांसाठीच्या सुविधांची जाहिरात बसमध्येच केली तर अधिक फायदेशीर ठरेल. - अर्चना पुराणिक, प्रवासी''
''महिलांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी एक नर्स आहे. रात्री-अपरात्री मला प्रवास करताना अजिबात सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने महिलांना ज्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याविषयी काही माहिती आम्हाला नाही. ती माहिती प्रशासनाने महिलांपर्यंत पोहोचवली तर आम्हाला फायदा होऊ शकतो. - मेघना कांबळे, प्रवासी''