पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 09:15 PM2019-09-07T21:15:38+5:302019-09-07T21:25:11+5:30
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता..
पुणे : दरवर्षी दिवाळी बोनससाठी वाट पाहावी लागणाऱ्या पुणे महानगर परिवहन महांडळा (पीएमपी)तील कर्मचाऱ्यांना दोन महिने आधीच '' बाप्पा '' पावला आहे. पीएमपी संचालक मंडळाने दिवाळी बोनसवर शनिवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पीएमपी संचालक मंडळाची शनिवारी मुख्यालयात बैठक झाली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सीआयआरटीचे संचालक राजेंद्र सनेर पाटील, संचालक व नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे बैठकीला उपस्थित होते. पीएमपीची निर्मिती होण्यापुर्वी पीएमटी व पीसीएमटी कर्मचाऱ्यांना दोन्ही पालिकांच्या नियमांनुसार दरवर्षी बोनस दिला जात होता. त्यानुसार कंपनी स्थापन झाल्यानंतरही नियमितपणे बोनस दिला जातो. पीएमपीमध्ये सध्या सुमारे ९ हजार ३०० कर्मचारी आहेत. त्यामुळे दिवाळीपुर्वी त्यांना बोनस मिळण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रयत्न केला जातो. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अंसतोष निर्माण झाला होता. पण संचालक मंडळाने निर्णय घेत बोनस मंजुर केला होता. मागील वषीर्ही दिवाळीच्या तोंडावर बोनसला मंजुरी मिळाली.
यंदा दिवाळीला जवळपास दोन महिने बाकी आहेत. पण गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होणार आहे. त्यामुळे या काळात संचालक मंडळाची बैठक घेता येणार नव्हती. परिणामी, बोनस रखडला असता. यापार्श्वभुमीवर संचालक मंडळाने दिवाळीपुर्वीच्या अखेरच्या बैठकीतच बोनसला मंजुरी दिली. त्यामुळे कर्मचाºयांना दिवाळीपुर्वीच बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महापौर टिळक व शिरोळे यांनी दिली.
-------------
बडतर्फ नऊ जण पुन्हा सेवेत
तुकाराम मुंढे यांच्यासह नयना गुंडे यांनी बडतर्फ केलेल्या एकुण ३३ कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यापैकी बहुतेक कर्मचारी मुंढे यांनी बडतर्फ केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांची यापुर्वी सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले होते. त्यातील नऊ जणांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर सुनावणीसाठी पाच जण उपस्थित न राहिल्याने त्यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उर्वरीत कर्मचाऱ्यां चा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.
-----------