कारवाईच्या सत्रामुळे पीएमपी कर्मचारी नाराज
By admin | Published: May 22, 2017 06:46 AM2017-05-22T06:46:09+5:302017-05-22T06:46:09+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) विविध कारणांसाठी कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी पसरली आ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) विविध कारणांसाठी कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. मागील काही वर्षांत पीएमपीला खिळखिळी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गैरवर्तन व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. याबाबत कर्मचारी उघडपणे नाराजी व्यक्त करीत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर होत नसलेल्या कारवाईबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. त्यामध्ये पीएमपीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. ही माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खालील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्ट वाहकांकडून
लाखो रुपये घेऊन त्यांना क्लीन चिट दिली व किरकोळ एखाद्या केस असणाऱ्या अनेक सेवकांना अन्याय करून बडतर्फ केले, असे नमूद करण्यात आले आहे.
अनेक सेवकांच्या, अधिकारी भरती व बढतीमध्ये लाखो रुपयांचा अपहार, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. बस ठेकेदार यांच्याशी संगनमताने करार करून वार्षिक ३०० कोटी रुपयांचे नुकसान केले. यांसह विविध प्रकारचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भांडार विभागातील क्वालिटी कंट्रोलर अनंत वाघमारे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. बससाठी मागविण्यात आलेल्या सुट्ट्या भागांची तपासणी योग्य प्रकारे न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. एक दिवसाचे कमी वेतन, दंड, निलंबन, बडतर्फी अशा विविध प्रकारच्या कारवाईचा धडाका अजूनही सुरूच आहे. वाघमारे यांनी क्वालिटी कंट्रोलर अधिकारी असताना इंजिन व गिअर बॉक्सला जोडणाऱ्या इनपुट शाफ्टची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा मारला. मात्र हे इनपुट शाफ्ट बसला बसले नाही. त्यामुळे सुट्या भागांची योग्यप्रकारे तपासणी न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार शनिवारी त्यांचे निलंबन करण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी वाघमारे यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक (संचलन) आणि महाव्यवस्थापकपदाचा भार होता. मात्र महिनाभरापूर्वी मुंढे यांनी त्यांची क्वालिटी कंट्रोलर या तृतीय श्रेणीच्या पदावर बदली केली होती.