पीएमपी कर्मचाऱ्यांना वेतन फरक मिळणार
By admin | Published: February 17, 2016 01:37 AM2016-02-17T01:37:57+5:302016-02-17T01:37:57+5:30
पीएमपीमधील तब्बल साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीच्या करारानुसार द्यावयाच्या फरकाच्या रकमेसाठीचा ४० कोटींचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी पीएमपीकडे सुपूर्द केला.
पुणे : पीएमपीमधील तब्बल साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीच्या करारानुसार द्यावयाच्या फरकाच्या रकमेसाठीचा ४० कोटींचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी पीएमपीकडे सुपूर्द केला. मागील आठवड्यात पुणे महापालिकेनेही ५० कोटींचा निधी पीएमपीकडे वर्ग केला असल्याने या वेतनाच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन दिवसांत हा फरक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा फरकाचा निधी न दिल्यास पीएमटी कामगार संघ (इंटक) सह राष्ट्रवादी कामगार जनरल युनियन,तसेच महाराष्ट्र कामगार मंचाने आंदोलनाचा इशारा दिला होता.
पीएमपी कर्मचाऱ्यांंच्या सुधारित वेतन करारानुसार दोन्ही महापालिकांनी वेतन फरकाचे २७० कोटी रुपये तीन टप्प्यांत देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २०१४ ते २०१५ या वर्षात ९० कोटी रुपये देण्याचा ठराव दोन्ही महापालिकांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिका ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० कोटी रुपये देणार आहे. दोन्ही महापालिकांनी २०१४ मध्ये फरकाचे ९० कोटी रुपये दिले होते. तर, गेल्या वर्र्षी निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. मात्र, वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे पीएमटी कामगार संघ (इंटक)सह विविध कामगार संघटनांनी तातडीने निधी देण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मागील आठवड्यात पुणे पालिकेने तातडीने आपल्या हिश्श्याचा निधी मंजूर केला आहे. मात्र, पिंपरी पालिकेचा निधी न मिळाल्याने प्रशासनाकडे एक रुपयाचा निधीही कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेले नव्हते. अखेर मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा निधी मंजूर करून त्याचा धनादेश महापौर सुशीला धराडे, आयुक्त राजीव जाधव, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडे दिला. पीएमपीचे लेखापाल विभागाचे कर्मचारी मन्सूर शेख यांनी हा धनादेश स्वीकारला.