पीएमपीचा उडाला भडका; कोथरुड डेपोतील प्रकार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:31 AM2017-12-16T11:31:03+5:302017-12-16T11:35:13+5:30
पीएमपीएमएलच्या कोथरूडमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी बसने आज (शनिवार, दि. १६) अचानक पेट घेतला. यात पूर्ण बस जळून खाक झाली.
पुणे : पीएमपीएमएलच्या कोथरूडमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी बसने आज (शनिवार, दि. १६) अचानक पेट घेतला. यात पूर्ण बस जळून खाक झाली असून, चालकांनी इतर बस त्वरित घटनास्थळावरून हटवल्याने इतर बस सुरक्षित राहिल्या. यावेळी डेपो मधील अग्निशामक यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालकांकडून केला गेला, मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना यश आले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वासात वाजता कोथरूड डेपोमध्ये पार्क केलेली पीएमपीएमएल बस क्र. एमएच १२ एचबी १०२० ला मार्गावर काढण्यापूर्वी बंद अवस्थेत असतानाच अचानक आग लागली. यावेळी डेपो व्यवस्थापक आणि चालकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला. मात्र बस सीएनजी गॅसवर चालणारी असल्याने बसचा भडका उडाला.
दरम्यान अग्निशामक दलाला याबाबत कळवण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या कोथरूड अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी गजानन पाथ्रूडकर, अग्निशामक जवान पंढरीनाथ उभे, चालक शरद गोडसे यांच्या पथकाने तातडीने पाण्याचा मारा करून अवघ्या दोन मिनिटांत आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे प्रमाण एवढे मोठे होते, की पूर्ण बस जळून खाक झाली.
बसच्या इंजिन बाजूने आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. तर शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.