पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:09 AM2018-09-17T03:09:39+5:302018-09-17T03:10:47+5:30

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे

PMP gets 'push!' | पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

Next

हडपसर : गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे. शनिवारी चौकात सकाळी पावणेदहा वाजता बस बंद पडल्यामुळे प्रवाशांनाच ‘दे धक्का’ म्हणत बस ढकलून रस्त्याच्या बाजूला घेण्याची वेळ आली.
मगरपट्टा चौकात सकाळी ९.४३ वाजता पीएमपी बस बंद पडली. दुचाकी-चारचाकी वाहनांची खच्चून गर्दी होती. वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलत पुढे नेली आणि वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. वारंवार बस बंद पडत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालय, चाकरमानी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याची वाहिनी म्हणून पीएमपीकडे पाहिले जात असले तरी, त्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
पीएमपीची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे सामान्य कामगारांनीसुद्धा स्वत:चे वाहन वापरणे पसंत केले आहे. रस्ते मात्र तेवढेच असले तरी वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी, कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे.
सहाआसनी रिक्षाचालकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सुरू केले. त्या वेळी पीएमपीच्या बसेस रिकाम्या धावू लागल्या. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अनेक फतवे काढले. त्यामध्ये ‘सुखकर प्रवास पीएमपी बसचा प्रवास’ असे घोषवाक्य तयार केले. त्याशिवाय पीएमपीच्या प्रमुख थांब्यावर स्पीकरवरून प्रवाशांना पीएमपी बसने प्रवास करा, असे आवाहन केले जात होते. बसमध्ये सुमधुर गीतेही प्रवाशांना ऐकविली जात होती. झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली बस दाखवा आणि बक्षीस मिळवा, तसेच पीएमपी बसवर नामफलक नसलेल्या बस दाखवा आणि बक्षीस मिळवा या योजना बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. मात्र, गर्दी आणि प्रदूषणाचे कारण दाखवत सहाआसनी रिक्षांना शहराबाहेर काढले आणि पीएमपीचे पुन्हा पहिले पाढे सुरू झाले. वारंवार बंद पडणाऱ्या पीेएमपीची सेवा सुरळीत कधी होणार, असा खडा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. हडपसर ते कात्रज जाणारी बस नेहमीच खराब असतात, रस्त्यात बंद पडतात, सकाळची पहिली ट्रीपला बसला बिघाड ठरलेला असतोच.

प्रवाशांना रोजच होतो मनस्ताप
रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, खासगी वाहनांचा वापर टाळा, पीएमपीने प्रवास करा, असा नारा दिला जात आहे. मात्र, पीएमपीच्या बसेस
ठिकठिकाणी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळी कामावर जाण्याची घाई, वेळेवर पोहोचलो नाही, तर बिनपगारी होण्याची भीती, बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही, तरीसुद्धा प्रवासी पीएमपीने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: PMP gets 'push!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे