‘बस डे’ला पीएमपी उद्दिष्टापासून दूर; पावणेदोन कोटींची कमाई झाल्याचा प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:07 PM2020-02-12T12:07:36+5:302020-02-12T12:13:03+5:30
‘बस डे’चे निमित्त साधत पीएमपीने ठेवलेले दोन कोटी रुपये उत्पन्नचे उद्दिष्ट
पुुणे : ‘बस डे’चे निमित्त साधत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ठेवलेले दोन कोटी रुपये उत्पन्नचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. पण प्रवासी संख्येत किमान एक लाखाने वाढ झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. कारण सोमवारी प्रवासी वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात एकूण १ कोटी ८३ लाख हे विक्रमी उत्पन्न मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी प्रवाशांना दिलासा मिळाल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
मागील दोन वर्षांमध्ये पीएमपीच्या ताफ्यात ७०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या आहेत. तसेच चालक व वाहकांची संख्याही वाढली आहे. तिकीट उत्पन्नातील पीएमपीला १ कोटी ५० लाख रुपये तर पास विक्रीतून ५० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तिकीट विक्रीतून १ कोटी ४४ लाख तर पासमधून केवळ ३८ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यानुसार एकुण १ कोटी ८३ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील महिन्यात अधिकच्या बस मार्गावर नसतानाही १ कोटी ८९ लाख रुपयांचे उच्चांकी उत्पन्न मिळाले. यामध्ये पास विक्रीचा वाटा ४८ लाख रुपयांचा होता. पण बस डे दिवशी १८०० हून अधिक बस मार्गावर येऊनही दैनंदिन पासला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तिकीट विक्रीतून उच्चांकी उत्पन्न मिळाले असले तरी पासची मदत न झाल्याने प्रशासनाला उद्दिष्ट साध्य करता आले नाही. फेब्रुवारी महिन्यातील हे विक्रमी उत्पन्न असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न १
कोटी ५० लाख ते १ कोटी ६० लाखांपर्यंतच मिळाले होते. बस डेमुळे हा आकडा १ कोटी ८३ लाखांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
नियमितपणे १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळाल्यानंंतर सुमारे ११ ते १२ लाखांच्या दरम्यान प्रवासी संख्या असते, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता हे उत्पन्न १ कोटी ८३ लाखांवर गेल्याने प्रवासी संख्या सुमारे १ लाखांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसते. तिकीट विक्री वाढल्याने हा आकडा निश्चितपणे वाढल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
........
ब्रेकडाऊनला ब्रेक.
विक्रमी १८३३ बस मार्गावर येऊनही ब्रेकडाऊनचे प्रमाण मर्यादित राखण्यातही प्रशासनाला यश मिळाले. दररोज सरासरी १५०० ते १५५० बस मार्गावर असताना १२५ च्या पुढे बस मार्गावरच बंद पडत होत्या. पण सोमवारी ‘पीएमपी’च्या मालकीच्या केवळ ४५ तर भाडेतत्त्वावरील सुमारे ५० बसचे ब्रेकडाऊन झाले. त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला.