पीएमपीने '' एमएनजीएल '' ला दिले २७ कोटी; '' सीनजी ''चा प्रश्न सुटण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 07:29 PM2019-05-24T19:29:27+5:302019-05-24T19:40:33+5:30
पीएमपीने थकित रक्कम न दिल्यास कंपनीने सीएनजी पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता.
पुणे : सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शुक्रवारी (दि. २४) दिवसभर जोरदार हालचाली करून एमएनजीएल २७ कोटी रुपये दिले. दरम्यान, सीएनजी पुरवठा सुरूच ठेवण्याबाबत अद्याप एमएनजीएलकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.
एमएनजीएल ने दि. २२ मे रोजी पीएमपीशी पत्रव्यवहार करून एकुण थकित रक्कम सुमारे ४७ कोटी २२ लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये सन २०१४ पासून दि. १० मेपर्यंतची थकित रक्कम सुमारे २३ कोटी ९३ लाख रुपयांसह त्यावरील व्याज सुमारे १८ कोटी ६ लाख व जीएसटी ५ कोटी २२ लाख रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम न दिल्यास कंपनीने सीएनजी पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पीएमपीचे धाबे दणाणले. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ११४० बस सीएनजीवर धावतात. पुरवठा बंद केल्यास संपुर्ण बस वाहतुक कोलमडून जाणार होती. असे झाले असते तर प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असता. तसेच त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असता.
याअनुषंगाने पीएमपी प्रशासनाने तातडीने हालचाली करून महापालिकेकडे पैशांची मागणी केली. याचे गांभीर्य ओळखून पालिकेनेही संचलन तुटीपोटी २४ कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळपर्यंत ही रक्कम ह्यएमएनजीएलह्णच्या खात्यात जमा करण्यात आली. तत्पुर्वी सकाळी पीएमपी प्रशासनाने तीन कोटी रुपये ह्यएमएनजीएलह्णला दिले. त्यामुळे दिवसभर पीएमपीने एकुण २७ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली.
--------
व्याज, जीएसटीचा निर्णय प्रलंबित
थकित रकमेवरील व्याज व जीएसटीची रक्कम पीएमपीने दिलेली नाही. शुक्रवारी देण्यात आलेले २७ कोटी हे दि. १० मेपर्यंतची थकित रक्कम सुमारे २३ कोटी व मे अखेरपर्यंत होणारे बिल आगाऊ देण्यात आले आहे. व्याज व जीएसटीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
------------
आतापर्यंतची थकित रक्कम व मे महिन्याची आगाऊ रक्कम असे एकुण २७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे एमएनजीएलने अत्यावश्यक प्रवासी वाहतुक बस सेवा विचारात घेऊन ही सेवा सुरळित ठेवण्यासाठी सीएनजी पुरवठा विनाखंडीत सुरू ठेवावा.
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
----------