' पीएमपी’ला तेरा वर्षात सोळा अध्यक्ष; आठ अधिकाऱ्यांवर सोपविला होता तात्पुरता भार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:30 AM2020-07-25T08:30:58+5:302020-07-25T08:35:01+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड बससेवा एकत्रित करून पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती करण्यात आली.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची निर्मिती झाल्यापासून मागील १३ वर्षात सोळा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जगतपा हे सोळावे अध्यक्ष ठरले आहेत. तर पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून कार्यभार सोपविण्यात आलेले आठवेच अध्यक्ष आहेत. आठ अधिकाºयांवर तात्पुरता भार सोपविण्यात आला होता.
पुणे व पिंपरी चिंचवड बससेवा एकत्रित करून पीएमपीची २००७ मध्ये निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सुब्बराव पाटील हे पहिले अध्यक्ष ठरले. त्यांच्यानंतर एक-एक वर्षाच्या कालावधीने अश्विनीकुमार व नितीन खाडे हे अध्यक्ष मिळाले. आॅगस्ट २००९ मध्ये महेश झगडे यांच्याकडे एक महिन्यासाठी अतिरिक्त पदभार आला. त्यानंतर पाच महिन्यांसाठी शिरीष कारले आणि ११ महिन्यांसाठी दिलीप बंड प्रभारी अध्यक्ष राहिले. आर. एन. जोशी यांची नियुक्ती जानेवारी २०११ मध्ये झाली. त्यांनी तीन वर्ष पीएमपीचे अध्यक्षपद सांभाळले. एवढा कालावधी पीएमपीमध्ये राहणारे ते एकमेव अध्यक्ष आहेत. ते आॅक्टोबर २०१४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर जून २०१५ या नऊ महिन्यातच चार अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार होता.
अभिषेक कृष्णा यांच्या रुपाने पीएमपीला पाचवे पुर्णवेळ अध्यक्ष मिळाले. पण त्यांचीही वर्षभरातच बदली झाली. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्तांकडे आठ महिने पदभार सोपविला. मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तुकाराम मुंढे यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्याकडून १२ फेब्रुवारी २०१८ रोजी नयना गुंडे यांनी पदभार स्वीकारला. त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. तसेच जोशी यांच्यानंतर सर्वाधिक काळ अध्यक्षपदही त्यांच्याकडे राहिले. आता राजेंद्र जगताप हे सोळावे अध्यक्ष ठरले असून ते आता किती काळ पीएमपी सांभाळणार, याची उत्सुकता प्रवाशांना आहे.
----------------------
२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
अधिकारी कार्यकाळ
१) सुब्बराव पाटील दि. २६ आॅगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८
२) अश्विनीकुमार दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९
३) नितीन खाडे दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ आॅगस्ट २००९
४) महेश झगडे (अतिरिक्त पदभार) दि. २५ आॅगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९
५) शिरीष कारले (अतिरिक्त पदभार) दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०
६) दिलीप बंड (अतिरिक्त पदभार) दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११
७) आर. एन. जोशी दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४
८) आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार) दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४
९) श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार) दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५
१०) ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार) दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५
११) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५
१२) अभिषेक कृष्णा दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६
१३) कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार) दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७
१४) तुकाराम मुंढे दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८
१५) नयना गुंडे दि. १२ फेब्रुवारी २०१८ ते २४ जुलै २०२०
१६) राजेंद्र जगताप दि. २४ जुलै २०२०