पीएमपीची एका दिवसात जवळपास १ कोटी ९० लाखांची विक्रमी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:38 PM2020-01-07T21:38:32+5:302020-01-07T21:42:15+5:30

मागील काही वर्षांपासून कमी उत्पन्नामध्ये आर्थिक अडचणी सापडलेल्या पीएमपीला दिलासा

PMP high earns Rs 2 crore in a day | पीएमपीची एका दिवसात जवळपास १ कोटी ९० लाखांची विक्रमी कमाई

पीएमपीची एका दिवसात जवळपास १ कोटी ९० लाखांची विक्रमी कमाई

Next
ठळक मुद्दे‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न सध्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या जवळपास सोमवारी पीएमपीच्या सुमारे १५५० बस मार्गावर बस रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न

पुणे : मागील काही वर्षांपासून कमी उत्पन्नामध्ये आर्थिक अडचणी सापडलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ला सोमवारी (दि. ७) विक्रमी कमाईमुळे काहीसा दिलासा मिळाला. पीएमपीला सोमवारी एका दिवसात तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील पाच वर्षात पहिल्यांदाच विक्रमी उत्पन्न मिळाल्याने ‘पीएमपी’साठी नवीन वर्षातील पहिला सोमवार दिलासादायक ठरला.
मागील काही वर्षांपासून जुन्या झालेल्या बस, ब्रेकडाऊन अशा विविध कारणांमुळे पीएमपीच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे तोट्यामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या पीएमपीला सातत्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मदतीसाठी हात पसरावे लागतात. काहीवेळा कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही प्रशासनाकडे पुरेसे पैसे नसतात. ईलेक्ट्रिक बससह नवीन सीएनजी बस आल्यानंतर काही प्रमाणात ही स्थिती बदलू लागली आहे. दैनंदिन उत्पन्न १ कोटी ६० लाखांच्या जवळपास पोहचले आहे. उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाहक-चालकांसाठी प्रोत्साहन योजना, ब्रेकडाऊन कमी करण्याचे प्रयत्न, तिकीट तपासणी, बस वेळेत मार्गस्थ करण्याबाबत संबंधितांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम सध्या जाणवू लागले आहेत.

‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न सध्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या जवळपास असते. तर मार्गावर जवळपास दीड हजार बस धावतात. सोमवारी नवीन वर्षातील पहिल्या सोमवारी ‘पीएमपी’ला पहिला सुखद धक्का बसला. ‘पीएमपी’चे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात जानेवारी २०१५ मध्ये पहिल्या आठवड्यात एका दिवसातील उत्पन्न तब्बल २ कोटी ५ लाख रुपये एवढे होते. त्यानंतर आतापर्यंत एकदाही पीएमपीला या उत्पन्नाच्या जवळपास जाता आले नाही. यापार्श्वभुमीवर सोमवारी १ कोटी ९० लाख रुपयांचा टप्पा पार केल्याने अधिकारी व कर्मचाºयांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. 
--------------

‘ख्रिसमस’च्या सुट्टया संपल्यानंतर बहुतेक शाळा काही दिवसांपुर्वी सुरू झाल्या आहेत. सुट्यानंतरचा पहिला सोमवार असल्याने नोकरदार, कामगार, विद्यार्थ्यांनी पास काढण्यासाठी गर्दी केली होती. यादिवशी पासचे उत्पन्न जवळपास ५० लाख रुपये मिळाले आहे. तर १ कोटी ४० लाख रुपये केवळ तिकीट विक्रीतून मिळाले असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. यापुर्वी जानेवारी २०१५ वगळता केवळ रक्षाबंधन या सणादिवशी पीएमपीचे उत्पन्न काही वेळा १ कोटी ८० लाखांच्या पुढे जात होते.
............................

सोमवारी पीएमपीच्या सुमारे १५५० बस मार्गावर होत्या. सुट्टया संपल्याने पासला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून आले. बस रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आगारांची अचानक तपासणी करून कामातील अनियमितता दुर केली जात आहे. ब्रोकन पध्दतीला प्रतिसाद मिळतोय. या सर्वाच्या एकत्रित परिणामुळे उत्पन्नात वाढ झाली.
- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी
 

Web Title: PMP high earns Rs 2 crore in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.