पीएमपीला १०० कोटींचा फटका

By admin | Published: June 14, 2016 04:46 AM2016-06-14T04:46:29+5:302016-06-14T04:46:29+5:30

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बारा वर्षाहून अधिक जुन्या बसेस, ठेकेदारांच्या नवीन बसेस असतानाही; त्यांची वेळेवर देखभाल दुरूस्ती होत नसल्याने वारंवार बसमध्ये होणारा बिघाड

PMP hit by 100 crores | पीएमपीला १०० कोटींचा फटका

पीएमपीला १०० कोटींचा फटका

Next

- सुनील राऊत,  पुणे

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बारा वर्षाहून अधिक जुन्या बसेस, ठेकेदारांच्या नवीन बसेस असतानाही; त्यांची वेळेवर देखभाल दुरूस्ती होत नसल्याने वारंवार बसमध्ये होणारा बिघाड यामुळे एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षात तब्बल १ लाख १२७ बसचे ब्रेकडाऊन झालेले आहे. एका गाडीचा ब्रेकडाऊन काढण्यासाठी सुमारे चार ते पाच हजार रुपयांचा खर्च आणि त्यानंतर गाडीच्या फेऱ्या रद्द झाल्यास सरासरी ५ ते १० हजारांचे होणारे आर्थिक नुकसान यामुळे वर्षभरात पीएमपीला तब्बल १०० कोटींचा आर्थिक
भुर्दंडही सहन करावा लागला आहे. त्यामुळे हे ब्रेकडाऊनचे प्रमाण रोखण्यासाठी पीएमपीला वेळीच पावले उचलावी लागणार आहेत.
पीएमपीच्या सरासरी १५०० बस रस्त्यावर येत असून वर्षभरात तब्बल ११ कोटी किलोमीटरची प्रवासी वाहतूक केली जाते. हे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाल्यास पीएमपीचा आर्थिक तोटाही कमी होण्यास मदत होणार आहे. या ब्रेकडाऊनची आकडेवारी पाहता महापालिकेच्या बस या जवळपास १० ते १२ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यांचे प्रमाण ५५ टक्के असले तरी, अवघ्या चार ते पाच वर्षे आर्युमान असलेल्या ठेकेदार, तसेच पीपीपी तत्त्वावर घेण्यात आलेले बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे.

खासगी बसची आघाडी
ब्रेकडाऊनची ही आकडेवारी पाहता प्रतिबस ब्रेकडाऊनच्या प्रमाणात ठेकेदार आणि पीपीपी तत्त्वावरील बसची आघाडी असल्याचे दिसून येते. पीएमपी प्रशासनाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात पीएमपीची एक बस 43 वेळा बंद पडते, तर पीपीपीवरील बस 53 वेळा बंद पडते. तर ठेकेदारांच्या ताफ्यात असलेली बस 52 वेळा बंद पडते. म्हणजेच पीपीपी तसेच ठेकेदारांच्या ताफ्यात असलेल्या नवीन बसची वेळेत देखभाल-दुरूस्ती होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. काही महिन्यांपूर्वी पीएमपीकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारणी केली जात असल्याने ठेकेदारांना बसच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वेळ मिळत नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर एक दिवस गाड्याही बंद करण्यात होत्या. मात्र, त्यानंतरही हीच स्थिती कायम असल्याचे चित्र आहे.

वर्षाला १०० कोटींचा फटका
पीएमपीच्या ताफ्यात सध्या २०२१ बस असून, त्यातील सुमारे १२०० बस पीएमपीच्या मालकीच्या असून २०० बस पीपीपी तत्त्वावर घेण्यात आलेल्या आहेत, तर उर्वरित बस भाडे कराराने घेण्यात आलेल्या आहेत. यातील पीएमपीच्या जवळपास ८०० बसच रस्त्यावर असतात.
या सर्व बसचे प्रमाण पाहता गेल्या वर्षभरात तब्बल १ लाख २७ ब्रेकडाऊन झालेले आहेत. त्यात सर्वाधिक ब्रेकडाऊन पीएमपीच्या गाड्यांचे असून त्यांची संख्या ५५ हजार ५९० आहे. तर पीपीपी तत्त्वावर घेण्यात आलेल्या बसचे तब्बल १० हजार ५४८ ब्रेकडाऊन झालेले आहेत, तर खासगी ठेकेदारांकडून भाडे करारावर घेण्यात आलेल्या बसचे तब्बल ३३ हजार ९२९ ब्रेकडाऊन झाले.
काही गाड्या काही वेळा पुरत्या बंद पडतात, तर काही गाड्या संपूर्ण दिवसभर बंद असतात. त्यामुळे ब्रेकडाऊन काढण्यासाठी पाठविलेले पथक तसेच गाडी दिवसभर बंद राहिल्यास होणारे नुकसान याची रक्कम एका गाडीसाठीची तब्बल १० हजार रूपये आहे.
ही रक्कम आणि ब्रेकडाऊनची संख्या लक्षात घेता होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा आकडा हा १० कोटी १२ लाख ७० हजार रूपयांचा आहे. या शिवाय या ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप नुकसान हे पैशात न मोजता येणारे आहे.

देखभाल-दुरूस्तीच मुख्य कारण
पीएमपीच्या तसेच ठेकेदारांच्या बस बंद पडण्यामागे बसची नियमित न होणारी देखभाल-दुरूस्ती हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ गाड्या बंद पडून आर्थिक नुकसान न होता, प्रवाशांची गैरसोय होतेच, या शिवाय शहरातील पीएमपीच्या अपघातांची संख्या वाढत असल्याचेही दिसून येते.
या बसच्या देखभालीसाठी पीएमपीकडून सर्व डेपोमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी एका तासाच्या आत गाडी दुरूस्त करून रस्त्यावर आणण्याची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केल्याने गेल्या काही महिन्यांत पीएमपीला मासिक ब्रेकडाऊनचे प्रमाण सुमारे हजारने कमी करणे शक्य झालेले आहे.
याउलट पीएमपीशी असलेल्या करारामधील तरतुदी, तसेच चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे ठेकेदारांकडील बस रस्त्यावर न आल्यास त्याचा मोठा दंड आकारला जात असल्याने ठेकेदाराकडून दंडाला पर्याय म्हणून बसची अर्धवट देखभाल दुरूस्ती करूनच त्या रस्त्यावर उतरविल्या जात असल्याचे वास्तव आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये रस्त्यावर पीएमपी बस वारंवार पडतात. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे हाल होतात. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. बस बे्रकडाउन होण्याचे प्रकार थांबण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होते.

Web Title: PMP hit by 100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.