तुकाराम मुंढे यांच्या काळातही होती पीएमपीत अनियमितता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 08:51 PM2019-04-19T20:51:42+5:302019-04-19T20:53:16+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातही भांडार विभागात अनियमितता झाली होती.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातही भांडार विभागात अनियमितता झाली होती. त्यामुळे या विभागाचे त्यांच्या काळातील खरेदीचेही ऑडिट केले जात आहे. प्राथमिक तपासात कमी किंमतीचे सुट्टे भाग वाढीव किंमतीने खरेदी करणे, गरज नसताना सुट्टे भागांची खरेदी करणे, विक्रेत्यांना वाढीव रक्कम देण्याचे प्रकार समोर येत आहेत.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुंढे यांची मार्च २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण वर्ष पुर्ण होण्याआधीच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बदली झाली. मुंढे यांनी आपल्या लौकिकाला साजेशी सुरूवात करून पीएमपीमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यानुसार त्यांनी अनेक बेशिस्त कर्मचारी व अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही. असे असतानाही भांडार विभागामध्ये मात्र काही कर्मचाऱ्यांकडून सुट्टे भागांच्या खरेदीत घोळ केला जात होता. पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडार विभागामध्ये अनियमितता असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मुंढे यांच्या काळातही अशी अनियमितता झाली आहे. त्यामुळे २०१७ पासून आतापर्यंतचे ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटपूर्वी येथील दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तपासामध्ये सुट्टे भागांची गरज नसताना खरेदी करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जादा दराने खरेदी, विक्रेत्याला खरेदीपेक्षा जास्त पैसे देणे असे प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आणखी खोलवर तपासणी केली जाऊ शकते. सुट्टे भागांची गरज नसताना होत असलेली खरेदी रोखण्यासाठी भांडार विभागाचे संगणकीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनियमितता टाळता येणार आहे.
---------