पुणे विमानतळापासून पीएमपीची विशेष ई-बस सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 09:03 PM2020-10-23T21:03:10+5:302020-10-23T21:06:56+5:30
पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे विमानतळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ई-बस सेवा सुरू झाली आहे.
पुणे : विमान प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शुक्रवार (दि. २३) पासून विशेष ई-बससेवा सुरू केली. विमानतळापासून शहरात पाच मार्गांवर या बस धावणार असून इतर प्रवाशांनाही या बसने प्रवास करता येणार आहे. मात्र या बससेवेसाठी ५०, १००. १५० व १८० असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे विमानतळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ई-बस सेवा सुरू झाली आहे. एअरपोर्ट बस फॉर बिझनेस होम अॅन्ड हॉटेल कनेक्टिव्हिटी (अभि) या संकल्पनेअंतर्गत प्रवाशांना आकर्षित केले जाणार आहे. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते विमानतळ परिसरातून पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार माधुरी मिसाळ, विमानतळ संचालक कुलदीप सिंग, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे आदी उपस्थित होते.
काही महिन्यांपुर्वी विमानतळावरून शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी बससेवा सुरू होती. परंतु वाढीव तिकीट दर तसेच विविध कारणांमुळे या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही. आता पहिल्यांदाच तिकीट दराच्या सुसुत्रीकरणासह ई-बस मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाच मार्गांवर ४३ बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू राहील.
-----------
प्रवाशांसाठी सुविधा
- वातानुकूलित यंत्रणा
- प्रदुषणविरहित
- बसमध्ये प्रशस्त जागा
- सामान ठेवणे सोपे
- वायफाय, इंटरनेटही उपलब्ध करून देणार
- बसमध्येच विमानांच्या माहितीसाठी स्क्रीन लावणार
- विमानतळावर बस मार्गांच्या माहितीसाठी एलईडी स्क्रीन लावणार
- विमानतळ आवारात सहा ठिकाणी इंग्रजी व मराठीतून फलक
----------------
बसचे मार्ग
- विमानतळ - कोथरूड - विमानतळ - ७ बस
- विमानतळ - हडपसर - विमानतळ - ५ बस
- विमानतळ - हिंजवडी - विमानतळ - १६ बस
- विमानतळ - स्वारगेट - विमानतळ - ७ बस
- विमानतळ - निगडी - विमानतळ - ८ बस
------------------