पीएमपीला मिळेना स्वाईप मशिन
By admin | Published: December 25, 2016 04:50 AM2016-12-25T04:50:55+5:302016-12-25T04:50:55+5:30
पास केंद्रांवर कॅशलेस व्यवहारासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पहिले पाऊल टाकले असले तरी त्याला बँकेची साथ मिळताना दिसत नाही. बँकेने तातडीने
पुणे : पास केंद्रांवर कॅशलेस व्यवहारासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पहिले पाऊल टाकले असले तरी त्याला बँकेची साथ मिळताना दिसत नाही. बँकेने तातडीने स्वाईप मशिन देण्यास नकार दिल्याने पास केंद्रांवर रोखीनेच व्यवहार होणार आहेत.
पीएमपीची पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी ५० हून अधिक पास केंद्रे आहेत. या केंद्रांमधून प्रवाशांना मासिक, तिमाही, सहा महिने व वर्षाचा पास दिला जातो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पास विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने पीएमपीच्या उत्पन्नात घट झाली. मागील महिनाभरात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान पीएमपीला सहन करावे लागले आहे. याचा
विचार करून पीएमपी प्रशासनाने सुमारे २० मोठ्या पासकेंद्रांसाठी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. पीएमपीचे सर्व व्यवहार एका राष्ट्रीयीकृत बँकेतून चालतो. प्रशासनाने बँकेकडे २० स्वाईप मशिनची मागणी केली होती. मात्र बँकेने मशिन देण्यास नकार दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नोटाबंदीनंतर बँकाकडे स्वाईप मशिनसाठीही मोठी मागणी आहे. त्यामुळे मागणीनुसार या मशिन उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. परिणामी स्वाईप मशिनसाठीही जणू रांगा लागल्याची स्थिती आहे. सेंट्रल बँकेनेही पीएमपीला हेच कारण देऊन मशिन उपलब्ध होणार नाहीत, असे प्रशासनाला कळविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेच्या या भूमिकेमुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. एकीकडे तोटा सहन करत असताना दुसरीकडे स्वाईप मशिनही मिळत नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने आता कॅशलेस व्यवहारासाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार सुरू केला आहे.
‘डीडी’च्या
पर्यायावर विचार
बँकेकडून स्वाईप मशिन मिळणार नसल्याने पीएमपी प्रशासनाने डिमांड ड्राफ्ट (डीडी) चा विचार सुरू केला आहे. शहरातील कोणत्याही पास केंद्रावर संबंधित किमतीचा ‘डीडी’ जमा केल्यास प्रवाशांना पास दिला जाईल. या पर्यायावर विचार सुरू असून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या तरी प्रवाशांना पाससाठी रोख रक्कमच द्यावी लागणार आहे.