पीएमपीचे आता ‘मागणीनुसार पुरवठा’ धोरण : मार्ग आणि बसस्थानकांचा अभ्यास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:16 PM2018-04-25T21:16:27+5:302018-04-25T21:16:27+5:30
‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात.
राजानंद मोरे
पुणे : एखाद्या मार्गावर प्रवाशांची गर्दी अधिक अन् बसेसची संख्या कमी असते. कधी बसेसच्या ब्रेकडाऊनमुळे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे बस प्रवाशांनी ओसंडून वाहतात. त्याचवेळी इतर मार्गांवर एकामागोमाग तीन-चार बसेस रिकाम्या धावताना दिसतात. ही विसंगती दुर करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ‘मागणीनुसार पुरवठा’ हे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी, मागणी पाहून संबंधित मार्गांवर बस सोडण्याच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विविध मार्गांचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.
‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. नियोजित बसेच्या तुलनेत प्रत्यक्षात मार्गावर येणाऱ्या बसेसची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच मार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे काही मार्गांवर नियोजित वेळापत्रक कोलमडते. दोन बसेसमधील वेळेचे अंतर वाढते. अपेक्षेपेक्षा कमी बस मार्गावर आल्याने ठराविक बसेसला गर्दी होते. प्रवाशांना तासन् तास बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. प्रामुख्याने सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते आठ यावेळेत विद्यार्थी व चाकरमान्यांची बसेसला गर्दी असते. दुपारच्या वेळेत तुलनेने बस रिकाम्या धावतात. तर काही मार्गांवर गर्दी नसतानाही बस सोडल्या जातात. त्यामुळे एकामागोमाग रिकाम्या बस जातात. एका मार्गावर रिकाम्या तर दुसऱ्या मार्गावर भरून वाहणाऱ्या बसेसचे विसंगत चित्र नेहमीच दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
------------
मागणीनुसार बस
एखाद्या मार्गावर अपेक्षित बस न आल्यास किंवा ब्रेकडाऊनमुळे वेळापत्रक कोलमडल्यास प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी ‘पीएमपी’कडून संबंधित मार्गावर जादाची बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच सकाळी किंवा सायंकाळी काही ठराविक मार्गांवर गर्दी असते. या मार्गांवर गरजेनुसार बस सोडल्या जातील. काही मार्गांवर मागणी नसूनही जादा बस असतात. या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी गरजेनुसार तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जाईल.
-----------------
अभ्यास सुरू
पीएमपी प्रशासनाकडून प्रवाशांची गर्दी व मागणीनुसार बस सोडण्याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी प्रवासी संघटना, प्रवासी, सीआयआरटी, वाहतुक पोलिस, दोन्ही महापालिका, स्मार्ट सिटी प्रकल्प यांचीही मदत घेतली जाणार आहे. सुमारे ७० ते ८० मार्ग गर्दीचे आहेत. या मार्गांवर बसेसला मागणी असते. पण बसेसच्या उपलब्धतेअभावी ते शक्य होत नाही. सध्या नवीन १३२ मिडी बस दाखल झाल्या असून आणखी शंभर बस लवकरच येतील. त्यानुसार या गाड्यांचे गर्दीच्या मार्गावर नियोजन करण्याबाबत अभ्यास सुरू आहे.प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवा देण्याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला आहे. गर्दीवेळी ठराविक मार्गांवर बसेसची संख्या वाढविण्यात येईल. ब्रेकडाऊन किंवा इतर कारणांमुळे एखाद्या मार्गावर बस कमी असतील तर जादाची बस मार्गावर सोडण्याचे नियोजन केले जाईल. ‘मागणीनुसार पुरवठा’ या तत्वानुसार बस सोडण्याचे विचाराधीन आहे.
- अजय चारठणकर, महाव्यवस्थापक (प्रशासन)
पीएमपीएमएल
----------------सध्याचे बसमार्ग
नियमित - २४२
बीआरटी - ४४
वातानुकूलित - ३
रातराणी - ६
स्कुल बस - ७
गर्दीचे मार्ग - ७० ते ८०
---------------------