PMPML: पीएमपीचा 'पास'ही होणार कॅशलेस, क्युआर कोडवर करता येणार पेमेंट
By भाग्यश्री गिलडा | Published: October 21, 2023 06:32 PM2023-10-21T18:32:50+5:302023-10-21T18:33:33+5:30
आता महामंडळाच्या सर्व पास केंद्रावर कॅशलेस पास सुविधा सुरु करण्यात आली आहे...
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये १ ऑक्टोबर २०२३ पासुन सर्व बसेस मध्ये ई-तिकीट सुविधा सुरु करण्यात आली. त्यानंतर आता महामंडळाच्या सर्व पास केंद्रावर कॅशलेस पास सुविधा सुरु करण्यात आली आहे.
महामंडळाला महिन्यातून सरासरी ६० हजार पासची विक्री होते. कॅशलेस तिकिटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून येत्या सोमवार (दि. २३) पासुन महामंडळाच्या सर्व ४० पास केंद्रावर प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅशलेस पास सुविधेचा शुभारंभ होणार आहे. पास काढण्यासाठी सर्व नागरिकांनी कॅशलेस सुविधेचा वापर करून पेमेंट करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट-
- पास केंद्रावरील सेवकास ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
- क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
- पास केंद्रावरील सेवकांकडून पास प्राप्त करणे.