जागा न दिल्यास पीएमपी पोलीस चौकीत
By admin | Published: January 22, 2017 04:56 AM2017-01-22T04:56:25+5:302017-01-22T04:56:25+5:30
महिलांच्या राखीव जागेवर बसणाऱ्या पुरुष प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कडक पावले उचलली आहेत. संबंधित महिला, वाहकाने
पुणे : महिलांच्या राखीव जागेवर बसणाऱ्या पुरुष प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कडक पावले उचलली आहेत. संबंधित महिला, वाहकाने उठण्याची वारंवार विनंती करूनही जागा सोडण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला थेट पोलीस चौकीत नेले जाणार आहे. संबंधित प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.
पीएमपी प्रशासनाने बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूकडील सर्व आसने राखीव ठेवली आहेत. त्यानुसार या जागेवर पुरुष प्रवाशांना बसण्यास मनाई आहे. याबाबतचा निर्णय २०१२मध्येच घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होती. मात्र, अनेकदा गर्दीतही या जागेवर पुरुष बसल्याचे दिसून येते. संबंधित महिला प्रवासी व वाहकाने विनंती केल्यानंतर हे प्रवासी जागेवरून उठतात. काही प्रवाशांकडून महिलांना दाद दिली जात नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशासोबत महिला व वाहकाचे वादही होतात. बसमध्ये गर्दी नसल्यास पुरुष प्रवाशांना महिलांच्या राखीव जागेवर बसण्यापासून कोणीही अडवत नाही. पण, गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना राखीव जागा देणे आवश्यक आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.(प्रतिनिधी)
१०० रुपये दंड आकारणार
महिलांना जागा न देणाऱ्या पुरुष प्रवाशाकडून यापुढे १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. येत्या सोमवारपासून त्याची कडक अंमलवजावणी केली जाणार असून, त्याबाबत सर्व आगारप्रमुखांना कळविण्यात आले आहे. तसेच बसमधील वाहक व महिलांना दाद न देणाऱ्या पुुरुष प्रवाशांना बसमधूनच थेट पोलीस चौकीत नेले जाईल. तिथे तक्रार देऊन बस पुन्हा मार्गस्थ होईल. बसमध्ये वाद टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे.
- बसमध्ये वारंवार विनंती करूनही दाद न दिल्यास संबंधित प्रवाशाला घेऊन बस थेट पोलीस चौकीत जाईल. या ठिकाणी बसचालक, वाहक व प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना केली जाणार आहे. प्रवाशांचा अधिक वेळ जाऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) अनंत वाघमारे यांनी दिली.