पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांची बदली; रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी नवे अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 07:55 PM2020-01-16T19:55:46+5:302020-01-16T19:57:11+5:30
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गुंडे यांच्याकडे आली होती पीएमपीची जबाबदारी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नयना गुंडे यांनी दि. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची केवळ दहा महिन्यांतच बदली करण्यात आली होती. त्यानंतर गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी आली. त्यांनाही केवळ १ वर्ष ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांच्या कार्यकाळामध्ये पीएमपीच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रीक बस, २०० मिडी बस तर सुमारे ४०० सीएनजी बस दाखल झाल्या. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीएमपीला बस मिळाल्या आहेत. त्यांनी बस खरेदी व भाडेतत्वाची प्रक्रिया वेगाने पार पाडली. देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत ई-बस दाखल झाल्या. भेकराईनगर व निगडी हे दोन आगार देशातील पहिले ई-आगार ठरले.
महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्याचा मानही गुंडे यांना जातो. महिलांसाठी ५० हून अधिक बस सुरू करण्यात आल्या. मागील काही वर्षांपासून रेंगाळलेले आस्थापना आराखड्याचे कामही त्यांनी सुरू केले. त्यानुसार नुकतेच १४०० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले. लवकरच या आराखड्याची अंमलबजावणी पुर्ण क्षमतेने होईल. पण बसस्थानकांच्या दुरावस्थेमध्ये फरक पडलेला नाही. मुख्य बसस्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. स्थानकांवर वेळापत्रक नसणे, बसचे ब्रेकडाऊन रोखणे, ठेकेदारांकडील बसची स्थिती, बस आगारांचा विकास, बसला होणारा विलंब, संगणकीकरण, कुशल कर्मचारी भरती अशा विविध मुद्यांवर प्रशासन सातत्याने अपयशी ठरले आहे. सुर्यवंशी यांच्यासमोरही ही आव्हाने असणार आहे.
----------------