पीएमपी येतेय मार्गावर
By Admin | Published: May 21, 2017 04:08 AM2017-05-21T04:08:12+5:302017-05-21T04:08:12+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला मार्गावर आणण्याचे आव्हान स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येताना
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खिळखिळ््या झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला मार्गावर आणण्याचे आव्हान स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. गैरवर्तन, कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा, ब्रेकडाऊनला ब्रेक लावणे तसेच अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी युद्धपातळीवर सुरू केलेले प्रयत्न, ठेकेदारांवर सुरू केलेली कारवाई यामुळे या सुधारणा होऊ लागल्या आहेत. ब्रेकडाऊन व बंद बसेसचे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
तुकाराम मुंढे यांनी दि. २९ मार्च रोजी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारला. या वेळी ‘पीएमपी’ची स्थिती दयनीय झाली होती. ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यानंतर पूर्णवेळ आयएएस दर्जा अधिकारी मिळाला नाही. अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर काही महिन्यांतच बदल्या झाल्या, तर काही अधिकाऱ्यांनी पदभारही स्वीकारला नाही. डॉ. श्रीकर परदेशी हे काही महिने पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बससेवेत सुधारणा झाल्या होत्या. पण त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली. डॉ. परदेशी यांचा कार्यकाळ वगळता मागील दहा वर्षांत एकदाही सकारात्मक चित्र दिसून आले नाही. मात्र, मुंढे यांनी काम सुरू केल्यानंतर पीएमपी पुन्हा सुधारणांच्या मार्गावर स्वार झाली आहे.
‘पीएमपी’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दि. २९ मार्च रोजी पीएमपीच्या ताफ्यातील ११९२ बसेसपैकी ६१२, तर भाडेतत्त्वावरील ८५३ बसेसपैकी ६७५ बस
मार्गावर होत्या, तर बंद बसेसचे
प्रमाण ३७ टक्के होते.
त्यादिवशी ब्रेकडाऊनचे प्रमाणही
मोठे असल्याचे आकडेवारीवरून दिसते. पीएमपीच्या १६७ तर भाडेतत्त्वावरील १७८ बसेसचे ब्रेकडाऊन झाले होते.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही स्थिती सुधारण्यासाठी पीएमपीतील सर्वच विभागांना ९० दिवसांचे टार्गेट दिले. बेशिस्त आणि कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू करून मुंढे यांनी आपल्या कामाची जोरदार सुरुवात केली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहे. मुंढे यांना पीएमपीमध्ये येऊन नुकतेच ५० दिवस झाले. या ५० दिवसांच्या कालावधीत मार्गावरील बसेसमध्ये वाढ होण्याबरोबरच ब्रेकडाऊनचे प्रमाणही निम्म्याने कमी झाले आहे.
खिळखिळ््या बस हद्दपार होणार?
पीएमपीच्या ताफ्यात ८ ते १० वर्षांहून अधिक कालावधीच्या काही बस आहेत. या बस अत्यंत खिळखिळ््या झाल्या असून मार्गावर धावताना ‘पीएमपी’ बससेवेची स्थिती स्पष्टपणे दिसून येते. सध्या बससेवेत सुधारणा होत असली तरी या बसेसमुळे प्रवाशांमध्ये नकारात्मक चर्चा सुरू होते. बसला खिडक्या नसणे, दरवाजा दोरीने बांधलेला असणे, आसनव्यवस्था चांगली नसणे, पत्रे उचकटलेले असणे तसेच मार्गावर सातत्याने बंद पडणाऱ्या अशा बसेसमुळे प्रवाशांनाही मनस्ताप
सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे प्रवासीही बसला धक्का मारून मार्गावर आणण्याचा
प्रयत्न करत आहेत. मात्र, ब्रेकडाऊनमध्ये
सातत्य राहिल्यास प्रवासी या सेवेकडेही पाठ फिरवतील.
बस देखभालीसाठी मर्यादा
बसेसच्या देखभालीसाठी मुंढे यांनी मर्यादा निश्चित करून दिली आहे. यापूर्वी प्रत्येक बसची सर्व्हिसिंग ठराविक दिवसांनंतर केली जात होते. आता सर्व्हिसिंगसाठी किलोमीटरची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यानुसार बस ३ हजार ७५० किलोमीटर धावल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी करावी लागते. त्यानंतर २० हजार ५०० किलोमीटरला दुसऱ्यांदा बसची पाहणी करून आवश्यक सर्व्हिसिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर ४५ हजार किलोमीटर धावल्यानंतर बसचे पूर्ण सर्व्हिसिंग केले जात आहे. त्यामुळे ब्रेकडाऊनला ब्रेक लागला आहे.
ठेकेदारांना तंबी
पीएमपीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रमाणेच मुंढे यांनी ठेकेदारांनाही तंबी दिली आहे. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्याबरोबरच अधिकाधिक बस मार्गावर आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ब्रेकडाऊनसाठी त्यांना मोठा दंडही आकारला जात आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसेसचे मार्गावरील प्रमाण वाढले आहे. तसेच ब्रेकडाऊनही कमी झाले आहे.
सुटे भाग दर्जेदारच
बसेसचे सुटे भाग खराब झाल्यानंतर यापूर्वी उपलब्धतेनुसार कोणत्याही कंपनीचे खरेदी केले जात होते. किंवा सुटे भाग मिळविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याचे चित्र होते. आता तुकाराम मुंढे यांनी ठराविक दोन कंपन्यांकडूनच दर्जेदार सुटे भाग घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी स्वत: संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे आता या दोन कंपन्यांकडूनच सुटे भाग घेतले जात असून उपलब्धताही वाढली आहे. परिणामी बंद बस मार्गावर येण्यातील अडथळे दूर होऊ लागले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१४६० बसेस मार्गावर; सुटे भागही मिळू लागले
पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पीएमपीच्या ताफ्यातील ७७३ तर भाडेतत्त्वावरील ६८७ अशा एकूण १४६० बस मार्गावर होत्या. दीड महिन्यांपूर्वीच्या मार्गावरील बसेसशी तुलना केल्यास ही संख्या १०० ते १५० ने अधिक आहे. या बसेसच्या संख्येत सातत्य राहत आहे. ब्रेकडाऊनचे प्रमाण जवळपास १५० पर्यंत खाली आले आहे. मुंढे येण्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसह विविध कारणांमुळे मार्गावर न येणाऱ्या बसेसचे प्रमाण ४०० ते ४५० पर्यंत होते. आता हे प्रमाण २५० ते २६५ पर्यंत कमी झाले आहे.
चालक व वाहकांअभावी बंद बसेसची संख्या १०० च्या जवळपास होती. आता कारकुनी करणाऱ्या चालक-वाहकांना मार्गावर आणल्याने हे प्रमाण शनिवारी २३ एवढे कमी होते. सध्या १०० बस इंजिन व इतर मोठ्या बिघाडामुळे बंद आहेत. जवळपास ४५ इंजिन तयार करण्यात आले असून इतर सुट्या भागांची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत सुटे भाग मिळाल्यानंतर या बसही मार्गावर येतील.