पीएमपी थांबे बांधणीतील थांबवले गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:17+5:302021-04-10T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पीएमपीचे चांगले स्टिलच्या बांधणीचे थांबे काढून तिथे दुरूस्ती दाखवत कमाई करण्याचा उद्योग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पीएमपीचे चांगले स्टिलच्या बांधणीचे थांबे काढून तिथे दुरूस्ती दाखवत कमाई करण्याचा उद्योग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाणून पाडला. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
सिंहगड रस्त्यावरील फनटाईम सिनेमा समोरच्या थांबा व आणखी दोन थांब्यांबाबत हा प्रकार झाला.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विकास निधीमधून हे चांगले स्टीलच्या मजबूत बांधणीचे थांबे ऊभारण्यात आले होते. मागील आठवड्यातील एका रात्री ते अचानक ऊखडून टाकण्यात आले.
मनसेचे महेश महाले, शिवाजी मते, योगेश ढगे, विलास पोकळे यांच्या लक्षात ही बाब आली.
त्यांनी नजर ठेवली. दुसऱ्या दिवशी काही कामगार हे थांबे तिथून घेऊन चाललेले त्यांना दिसले. विचारणा केल्यावर त्यांनी आपण पीएमपीचे अधिकृत ठेकेदार असून थांबे दुरूस्तीचे काम करत असल्याचे सांगितले. थांबे खराब कुठे झाले, कधी झाले, तुम्हाला कसे कळाले, अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांना ऊत्तरे देता आली नाही.
थांबे आपणच तोडायचे व नंतर दुरूस्तीला काढायचे असा हा प्रकार असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी जगताप यांची भेट घेऊन केला. थांब्याला धडक बसून थांबा तुटला तर त्याची काही फिर्याद आहे का? यांना दुरूस्तीचे अधिकार आहेत तर ते दुरूस्तीआधी खराब थांब्यांची छायाचित्र काढतात का? यापैकी कशाचाही समाधानकारक खुलासा दुरूस्ती करणार्यांना करता आला नाही. यापद्धतीने त्यांनी आतापर्य़त २० थांबे दुरूस्त केल्याचे सांगितले.
पीएमपीचे संचालक, नगरसेवक शंकर पवार यांनीही याची चौकशी करण्याचे आदेश दिले. जगताप यांनी यापुढे कोणत्याही थांब्याची दुरूस्ती करताना त्याची छायाचित्रासहित माहिती आपल्याला द्यावी असे अधिकाऱ्यांना बजावले.