पुणे, पिंपरीत पीएमपीचे थांबे ४ हजार अन् शेड केवळ १,४००
By admin | Published: July 19, 2015 03:56 AM2015-07-19T03:56:30+5:302015-07-19T03:56:30+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर भागांत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुमारे ४ हजार बसथांबे केले असले, तरी केवळ १,४०० बसथांब्यांवर शेड उभारण्यात आले आहेत.
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर भागांत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुमारे ४ हजार बसथांबे केले असले, तरी केवळ १,४०० बसथांब्यांवर शेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांना ऊन-पाऊस झेलतच प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, उभारण्यात आलेल्या शेडपैकी अनेक प्रवाशांसाठी गैरसोयीचेच ठरत आहेत. एका बाजूला बसस्टॉप नसताना दुसरीकडे खासदार आणि आमदार निधीतून गरज नसलेल्या ठिकाणीही उभारले गेल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.
दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पीएमपी बसने दररोज सुमारे १० लाख प्रवासी ये-जा करतात. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही लांबपर्यंत प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. बस धावणाऱ्या मार्गांवर पीएमपीने सुमारे ४ हजार अधिकृत बसथांबे दिले आहेत. या थांब्यांवर बसना थांबण्याची परवानगी असते. यामध्ये काही विनंती थांबेही आहेत. या थांब्यांपैकी सुमारे १,४०० थांब्यांवरच प्रवाशांसाठी शेड उभारण्यात आले आहेत. ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच, या शेडमध्ये प्रवाशांच्या बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यांतील सुमारे ५०० बसथांबे बीओटी तत्त्वावर जाहिरातदारांना देण्यात आले आहेत. त्यांनीच या थांब्यांची देखभाल करणे अपेक्षित आहे. तर, हे थांबे पीएमपीच्या मालकीचे आहेत.
पीएमपीने प्रवाशांसाठी उभारलेल्या अनेक शेड गैरसोयीच्याच ठरत आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत बऱ्याचशा शेडची
दुरवस्था झाल्याचे आढळून आले आहे. गळके छत, कचऱ्याचा
ढिगारा, श्वानांचा वावर, खासगी वाहनांचा विळखा, आसनव्यवस्था गायब अशा समस्यांना प्रवाशांना दररोज तोंड द्यावे लागते. सुमारे ४ हजार बसथांब्यांसाठी तेवढेच शेड असणे आवश्यक असताना उपलब्ध शेडचीही दुरवस्था झाली आहे. तसेच, खासदार व आमदारांच्या निधीतून ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या स्टीलच्या शेडही कुचकामी असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या आकाराबाबत वादही झाले आहेत.