पीएमपी तिकीट दरवाढीचा प्रवासी संघटनाकडून तीव्र विरोध; पीएमपीएल प्रवासी मंचचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:54 IST2024-12-16T08:53:19+5:302024-12-16T08:54:54+5:30
प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पीएमपी तिकीट दरवाढीचा प्रवासी संघटनाकडून तीव्र विरोध; पीएमपीएल प्रवासी मंचचा आंदोलनाचा इशारा
पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या पीएमपी बसच्या तिकीट दरवाढीचा विचार महापालिकेने केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पीएमपी प्रशासनाने त्रुटीतून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घ्यायचा विचार केला असला, तरी प्रवाशांसाठी हा अन्यायकारक आहे. पुण्यात दररोज सुमारे १० लाखांपेक्षा जास्त प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात. पीएमपी बस ही सर्वसामान्यांसाठी परवडणारी सेवा असल्याने लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. प्रवासी संघटनांच्या मते, ही दरवाढ केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी केली जात असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
२०१७ च्या आंदोलनाची आठवण
२०१७ साली पीएमपीच्या तिकीट दरवाढीविरोधात प्रवाशांनी मोठे आंदोलन केले होते. बसथांब्यावर फलक लावत आणि रस्त्यावर उतरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
तिकीट दरवाढ नको, सेवा सुधारणा हवी
प्रवाशांच्या मते, पीएमपी प्रशासनाने सेवा सुधारण्यावर भर द्यावा. वेळापत्रक नियमित पाळणे, सुरक्षित प्रवासाची हमी देणे आणि बसेसची संख्या वाढवणे हे उपाय यावर पर्याय ठरू शकतात. दरवाढ करून प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकण्यापेक्षा राज्य शासनाने पीएमपीला अधिक निधी द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
त्रुटीचे कारण काय?
पीएमपी प्रशासनाला यंदा ७०६ कोटींहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. कोरोनाच्या काळातील महसुली घट आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे पीएमपी तोट्यात आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेरही सेवा पुरवताना झालेला खर्च हा मोठ्या त्रुटीचे कारण ठरत आहे.
प्रशासनाकडून प्रतिक्रिया अद्याप प्रलंबित
प्रवाशांच्या तीव्र विरोधानंतरही अद्याप पीएमपी संचालक मंडळाने तिकीट दरवाढीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र, यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तिकीट दरवाढीऐवजी प्रवासी केंद्रित धोरण आखून पीएमपीच्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे. महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांना लक्ष्य करण्याऐवजी महापालिकेने पीएमपीच्या तोट्याचे कारण शोधून योग्य उपाययोजना कराव्यात. प्रवाशांना महागाईच्या खाईत ढकलले जात आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. - जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच