पीएमपीला हवाय मेट्रो, पीएमआरडीएचा आर्थिक आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 08:49 PM2020-12-10T20:49:06+5:302020-12-10T20:50:26+5:30
पुणे व पिंपरी चिंचवडशी जोडण्यासाठी विविध भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बससेवेची हद्द विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नव्याने अनेक मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न असून त्यासाठी अतिरिक्त निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरांतर्गत एकात्मिक वाहतुक धोरणाच्या अनुषंगाने पुणे मेट्रो, स्मार्ट सिटीकडूनही पीएमपीला निधीचा हातभार हवा आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पीएमपीच्या नियोजन योजनांसह विविध मागण्या विभागीय आयुक्त व पुणे युनिफाईड मेट्रो पोलिटन ट्रान्सपोर्ट अॅथोरिटी (पुमटा) कडे केल्या आहेत. याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत जगताप यांनी सादरीकरण केले. ‘पीएमपीआरडीए’चे क्षेत्र सुमारे सात हजार चौरस किलोमीटर एवढे आहे. हा भाग पुणे व पिंपरी चिंचवडशी जोडण्यासाठी विविध भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने काही मार्ग १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शिक्रापुर, चºहोली, वडगावशिंदे, मांजरी खुर्द, केसनंद, चांदे, नांदे आदी भागात बससेवा सुधारण्याची गरज असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. तसेच औद्योगिक परिसरातही बससेवा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे जगताप नमुद केले आहे.
बससेवाचा विस्तार करण्यासाठी आळंदी, चाकण एमआयडीसी, रांजणगाव, वाघोली, सासवड, डोणजे किंवा धायरी, उरळी कांचन व कापुरहोळ यांसह, पौड, कामशेत, तळेगाव दाभाडे आदी भागात आगारांची गरज आहे. यासाठी जागा आरक्षित करून पीएमपीला संचलन तुट मिळण्यासह नियोजन करण्याची विनंती करण्यात आली आहे. पीएमपीकडून मेट्रोकडून तयार करण्यात आलेल्या फिडर मार्गावर सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बससाठी आर्थिक सहाय्य व संचलन तुट महामेट्रोकडून मिळावे, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली आहे.
--------------------------------
पीएमआरडीए हद्दीत बससेवा वाढविण्यास मान्यता मिळाली आहे. या हद्दीत बससेवा सुरू असताना संचलनातील तुट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बस आगारांसाठी आरक्षित जागांचीही मागणी करण्यात आली आहे. याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी