पीएमपी बसला ‘निळी’ झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:36 AM2017-08-19T01:36:25+5:302017-08-19T01:36:27+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) लाल बसेसला आता ‘निळी’ झळाळी मिळणार आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) लाल बसेसला आता ‘निळी’ झळाळी मिळणार आहे. ताफ्यात दाखल होणा-या नवीन तसेच भाडेतत्त्वावरील बसेसला निळा रंग देऊन त्यावर पाना-फुलांचे आकार साकारले जाणार आहेत. या कामाला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने रंगरंगोटीचे काम पूर्ण केले जाणार आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या ६५३ बस भाडेतत्त्वावरील, तर २०० बस पीपीपी तत्त्वावरील आहेत. तर जवळपास एक हजार बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत पीएमपीला मिळालेल्या बस वगळता बहुतेक सर्व बसेसचा रंग लाल असून त्यामध्ये पिवळ््या रंगाचे पट्टे आहेत. तर ‘जेएनएनयुआरएम’च्या बसेसचा रंग पांढरा व गुलाबी रंगाचे पट्टे असलेल्या आहेत. मागील वर्षी पीएमपी प्रशासनाने ताफ्यात दाखल होणाºया नवीन बसेससाठी यापेक्षा वेगळा रंग देण्याची कल्पना पुढे आणली होती. बीआरटी व इतर मार्गांवरील नवीन बसेससाठी स्वतंत्र रंगसंगती असावी, हा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार तीन वेगवेगळ््या रंगछटा असलेल्या बसेसचा नमुना तयार करण्यात आला होता. या तीन नमुन्यापैकी एक नमुना निश्चित करण्यासाठी पुणेकर नागरिकांकडून त्यावर मतदान घेण्यात आले. त्यासाठी पर्याय क्रमांकानुसार टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या मतदानामध्ये पुणेकरांनी निळा रंग व त्यावरील पाना-फुलांच्या आकारातील पर्यायाला पसंती दिली होती. त्यानुसार प्रशासनाने ही रंगरंगती निवडली. त्यामध्ये संपूर्ण बसला निळा रंग असून त्यावर पाना-फुलांचे आकार असतील. त्यावर इंद्रधनुष्य लिंक असे मराठी व इंग्रजीमध्ये लिहिलेले व त्याचा लोगो असेल.
‘पीएमपी’तील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या ताफ्यात लवकर नवीन मध्यम आकाराच्या २०० बस दाखल होणार आहेत. या बसेसला हीच रंगसंगती निश्चित करण्यात आली असून या बसेस सज्ज झाल्या आहेत. लवकरच त्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सुरुवातीला केवळ या बसेसलाच हा रंग देण्याचे ठरले होते. पण भाडेतत्त्वावरील बसेसला दोन ते अडीच वर्षांनी नवीन रंग देण्याबाबत करारात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता भाडेतत्त्व व पीपीपीवरील बस पासिंग करून घेताना या नवीन रंगसंगतीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.