पीएमपी मार्गस्थ होणार का ?...
By admin | Published: May 1, 2017 03:12 AM2017-05-01T03:12:18+5:302017-05-01T03:12:18+5:30
तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात लगेचच बदल होईल, असे नाही. पण ही बससेवा सक्षम करण्यासाठी मुंढे यांच्याकडून पुणेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेच महत्त्व मोठे आहे. दररोज दहा लाखांहून अधिक प्रवासी या सेवेचा उपयोग करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून ढिसाळ नियोजनामुळे पीएमपीचे तीनतेरा वाजले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमटी व पीसीएमटी या दोन स्वतंत्र संस्थाचे एकत्रीकरण करून ‘पीएमपी’ची निर्मिती करण्यात आली. तरीही बससेवेत फारसा बदल झाला नाही. उलट मागील काही वर्षांत ही सेवा अधिक डबघाईला आली. ताफ्यातील सुमारे १२०० बसपैकी ३०० ते ४०० बस देखभाल- दुरुस्तीअभावी जागेवर उभ्या आहेत.
‘पीएमपी’ची निर्मिती करताना या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद म्हणजे पीएमपीचे नेतृत्व आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपविण्यात आले. २००७पासून मागील दहा वर्षांत तेवढ्याच अधिकाऱ्यांनी पीएमपीची धुरा सांभाळली. पण सेवेत ठळक असा कोणताही बदल झाला नाही. डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे काही महिने अतिरिक्त भार देण्यात आला होता. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे पीएमपीला ‘अच्छे दिन’ येतील, असे चित्र निर्माण झाले होते. काही महिन्यांतच त्यांचीही बदली झाल्याने पुन्हा उतरती कळा लागली. त्यामुळे पुणेकरांकडून त्यांच्यासारख्याच सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक पीएमपीवर करण्याची मागणी केली जात होती. अखेर तुकाराम मुंढे यांच्या रूपाने पीएमपीला कार्यक्षम अधिकारी मिळाला. मुंढे यांच्या नियुक्तीचे काही संघटनांनी फटाके वाजवून स्वागत केले. लौकिकाप्रमाणे मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच पीएमपीच्या सुधारणेसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. शिस्त आणि कामातील नियमिततेवर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे. त्यामुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांना निलंबित तर काहींना बडतर्फ करण्याचे पाऊल त्यांनी उचलले. आतापर्यंत त्यांनी शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यातून अधिकारीही सुटलेले नाहीत.
काहींचे निलंबन तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या निर्णयाबरोबरच त्यांनी कामकाजात अधिकाधिक आयटीचा वापर करण्यावर भर दिला आहे. ही सेवा प्रवासीकेंद्री करण्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील महिनाभरात त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गावरील बसमध्ये सुमारे १०० बसची भर पडली आहे. तर ब्रेकडाऊनचे प्रमाणही कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे पीएमपी सेवा सक्षम होईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांमध्येही निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतेक कर्मचारी त्यांना सहकार्य करीत आहेत. त्यांचे काही निर्णय वादग्रस्तही ठरले आहेत.
कर्मचाऱ्यांवर सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे संघटना नाराज झाल्या आहेत. तर तोट्यातील काही मार्ग बंद केल्यामुळे प्रवासी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पण मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे पीएमपीमध्ये होत असलेले सकारात्मक बदल होत असल्याचे सर्वच जण मान्य करत आहेत. महिनाभरातच त्यांनी दाखवलेली कामाची चुणूक पीएमपीचे भवितव्य प्रकाशमान असल्याचे दर्शविते. पण आतापर्यंत पीएमपीला मिळालेले अध्यक्ष फार काळ याठिकाणी राहिले नाहीत. केवळ काही महिने किंवा वर्षभराची कारकीर्द मिळून त्यांची बदली झाली. त्यामुळे पीएमपीचा रुतलेला गाडा बाहेर निघू शकलेला नाही. त्याला राजकीय कुरघोडीची किनारही लाभलेली आहेच. नियोजनबद्ध कामकाजाअभावी दोन्ही शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीची दुर्दशा झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पीएमपीचे नेतृत्व सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांनी घालून दिलेली व्यवस्थेवर पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी भर दिला पाहिजे. या व्यवस्थेमध्ये बदलासाठी सातत्य राहिले तरच पीएमपी सक्षमीकरणाची अपेक्षा बाळगता येईल. - राजानंद मोरे