Pune: गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:39 PM2024-09-06T14:39:46+5:302024-09-06T14:40:36+5:30
रात्री १२ नंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पीएमपी प्रशासनाने शेड्युलच्या गाड्यासह सुमारे ८०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्प्यात या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. ‘यात्रा स्पेशल’ या नावाने या बस धावतील. दुसऱ्या शिफ्टनंतर धावणाऱ्या या बसचा प्रवास पाच रुपयांनी महाग होणार आहे.
सध्याच्या तिकीट दरात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच रात्री १२ नंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मध्यवर्ती पुण्यातील रस्ता वाहतूक बंद झाल्यावर पर्यायी रस्त्याने पीएमपीच्या बसेसची वाहतूक केली जाणार आहे. शिवाय जादा बसेसची वाहतूक देखील केली जाणार असल्याचे पीएमपीने सांगितले आहे. यामध्ये पहिला टप्पा म्हणजेच ९, १० आणि १६ सप्टेंबर रोजी १६८ जादा बसेस धावतील. तसेच ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान ६२० जादा बसेस धावणार आहेत.