पीएमपीत आता ठेकेदारांचे ‘ब्रेकडाऊन’
By admin | Published: April 24, 2017 05:17 AM2017-04-24T05:17:07+5:302017-04-24T05:17:07+5:30
पीएमपी सक्षण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी आता ठेकेदारी पद्धतीला रेड सिग्नल दिला आहे.
पुणे : पीएमपी सक्षण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी आता ठेकेदारी पद्धतीला रेड सिग्नल दिला आहे. सेवेत कसूर करणाऱ्या पीएमपीतील विविध ठेकेदारांचे करार रद्द करण्याबाबत मुंढे आग्रही असल्याचे समजते. त्यांनी पीपीपी तत्त्वावर पीएमपीच्या बस चालविणाऱ्या एका ठेकेदाराला अशी नोटीस दिल्याचे समजते. त्यामुळे इतर ठेकेदारांचेही पीएमपीमध्ये ‘ब्रेकडाऊन’ होण्याची चर्चा सुरू आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी ठेकेदारी पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भविष्यात पीएमपीतील ठेकेदारी पद्धत बंद होण्याचे संकेत त्याच वेळी मिळाले होते. त्यानंतर प्रवाशांना चांगली बससेवा मिळण्यासाठी त्यांनी पीएमपीतील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनाही खडे बोल सुनावले होते. पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या सुमारे १२०० व भाडेतत्त्वावरील सुमारे ८५० बस आहेत. भाडेतत्त्वावरील बस पाच ठेकेदारांमार्फत चालविल्या जातात, तर मालकीच्या २०० बसेस पीपीपी तत्त्वावर एका ठेकेदाराला चालविण्यास देण्यात आल्या आहेत.
बसेससाठी सध्या पीएमपीला प्रतिकिलोमीटर ३८ रुपये वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये मोजावे लागतात. या बसेस पीएमपीच्या मालकीच्या असूनही पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून भाडेतत्त्वावरील बसेससाठी पीएमपीला दर महिन्याला कोट्यवधी रुपये ठेकेदारांना द्यावे लागत आहेत.