पी.एम.पी.एल बस लवकरच नीरापर्यंत धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:04+5:302021-03-20T04:11:04+5:30
जेजूरी पर्यंत सुरु असलेली पी.एम. पी. एल बस सेवा पुढे नीरा शहरा पर्यंत सुरु करावी यासंदर्भात नीरा शहर राष्ट्रवादी ...
जेजूरी पर्यंत सुरु असलेली पी.एम. पी. एल बस सेवा पुढे नीरा शहरा पर्यंत सुरु करावी यासंदर्भात नीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल सुळे यांनी घेत शुक्रवारी पी.एम.पी.एलच्या विभागीय कार्यालयात पत्र पाठवले असल्याची माहिती प्रमोद काकडे यांनी दिली. यामुळे लवकरच पुण्याची पी.एम.पी.एल. पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरा पर्यंत धावणार आहे.
पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरातून मोठ्यासंख्येने कामगार जेजुरी एम.आय.डी.सी किंवी पुढे सासवड, हडपसर व पुणे शहरात दररोज ये जा करतात. सध्या नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या एस्टी बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. लांब पल्याच्या एस्टी बस जेजुरी एम.आय.डी.सी किंवा इतर ठिकाणी थांबे घेत नाहीत परिणामी कामगारांचे मोठे हाल होतात. महिलांना कामानिमित्त प्रवास करताना धोकेदायक महागडा प्रवास करावा लागतो. शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारांना जेजूरी एम.आय.डी.सी येथे तासंतास उभे रहावे लागते. जेजुरीतून कामगार बसने पुण्यात लवकर जातात पण अठरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा शहरात पोहचायला दोन तास लागतात. जेजुरी नीरा वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने कामगारांचा वेळ वाया जातो.
"नीरा ते जेजुरी मोठ्या संख्येने कामगार, महिला व युवक कामानिमित्त प्रवास करतात. जेजुरी पर्यंत पी.एम.पी.एल. बस सुरू झाल्यापासून नीरासह परिसरातील कामगार बस सेवा सुरु करावी या संदर्भात मागणी करत होते. याची दखल खा. सुप्रिया सुळे यांनी घेत आज पी.एम.पी.एलचे अध्यक्ष तथा विभागीय संचालक राजेंद्र जगताप यांना पत्र पाठवलेआहे.
प्रमोद काकडे, नीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य.