'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:43 PM2021-06-30T20:43:38+5:302021-06-30T20:48:35+5:30
राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला.
पुणे : राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला. जगताप हे संरक्षण दलात पुन्हा रूजू झाले.ते संरक्षण दलातून प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीचा पदभार घेतला होता. 30 जून हा रोजी त्यांना मुदतवाढीचे पत्र येणे अपेक्षित होते. मात्र शासनाकडून पत्रच न आल्याने डॉ. जगताप यांनी बुधवारी आपला पदभार सोडला.
डॉ राजेंद्र जगताप हे संरक्षण दलात आयडीइएस या पदावर कार्यरत होते. २४ जुलै २०२० रोजी प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या ११ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीए च्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, केंद्र सरकारच्या फेम २ या अंतर्गत इ बस सेवा सुरू करणे, पुणे विमानतळ हुन वातानुकूलित 'अभी' नावाची बस सेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्याचा ११ महिन्यांचा कार्यकाल गाजला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला आहे.