बीआरटी मार्गावर निओ मेट्रोचा पीएमपीएलचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:21+5:302020-12-12T04:28:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: वादग्रस्त बीआरटी मार्गावर महामेट्रो ने निओ मेट्रो सुरू करावी, प्रामुख्याने स्वारगेट ते कात्रज व स्वारगेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: वादग्रस्त बीआरटी मार्गावर महामेट्रो ने निओ मेट्रो सुरू करावी, प्रामुख्याने स्वारगेट ते कात्रज व स्वारगेट ते हडपसर या दोन्ही मार्गावर हे होऊ शकते असा लेखी प्रस्ताव पीएमपीच्या वतीने शहर वाहतूक नियोजनासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि.९) झालेल्या बैठकीत देण्यात आला. तसा लेखी प्रस्ताव त्यांनी दिला. महामेट्रोने यासाठी महापालिकेची भूमिका महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे युनिफाईड मेट्रो पोलिटन ट्रान्सपोर्ट ऑथरिटी (पुम्टा)ची बैठक झाली. या बैठकीत पीएमपीएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी बीआरटी मार्गावर निओ मेट्रो सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. पीएमपीएलचा बीआरटी मार्ग सुरूवातीपासूनच वादग्रस्त झाला आहे. त्यावर पुरेशा क्षमतेने बस धावत नाहीत. अपघात होतात. त्यामुळेच हा मार्ग निओ मेट्रोसाठी वापरता येऊ शकतो असे त्या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. स्वारगेट ते हडपसर या मार्गावरही निओ मेट्रो करावी असे प्रस्तावात म्हटले आहे.
स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गासाठी भूयारी मार्गाचा प्रकल्प अहवाल मेट्रोने आधीच तयार केला आहे. महापालिकेनेच मेट्रोला असा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले व त्यासाठी निधीही दिला. या प्रकल्प अहवालाचे महापालिका सभागृहात सादरीकरण झाले असून तो महामेट्रो व राज्य सरकारकडे महापालिकेने दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा भूयारी मार्गाचा खर्च बराच मोठा असतो, त्या तुलनेत निओ मेट्रोचा पर्याय चांगला असल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे.
महामेट्रोचे संचालक (नियोजन) रामनाथ सुब्रम्हण्यम म्हणाले की, महामेट्रो नाशिकसाठी निओ मेट्रोवर काम करत आहे. बीआरटी मार्गाच्या रुंदीपेक्षा जास्त रुंदी निओ मेट्रोला लागते. याविषयी प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. महामेट्रोला महापालिकेकडून याविषयी सुचना व्हायला हवी. त्यांच्या आधीच्या सुचनेनुसार आम्ही मेट्रोसाठी स्वारगेट ते कात्रज अशा भूयारी मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या मार्गावर उड्डाणपूल असल्याने मेट्रोचा उन्नत मार्ग करता येणे शक्य नव्हते. शिवाजीनगरपासून स्वारगेट पर्यंत मेट्रोचा भूयारी मार्ग आहेच, तो तसाच पुढे कात्रजपर्यंत नेणे शक्य आहे.