पीएमपीएमएलच्या १० कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द; तुकाराम मुंढे यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:26 PM2017-11-18T13:26:56+5:302017-11-18T13:35:05+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. मात्र, प्रशासकीय आराखड अंतिम झालेला नसताना या कर्मचाऱ्यांना संबंधित पदांवर कायम केले होते. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहेत.
पीएमपी व पीसीएमटी एकत्रीकरण करून पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आली. एकत्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर २००७ नवीन पद निर्मिती व सुधारीत वेतनश्रेणी लागु करण्याबाबत संचालक मंडळामध्ये चर्चा झाली होती. या पदांवर त्यावेळी विविध पदांवर असलेल्या सुमारे १८ कर्मचाऱ्यांची नेमणूक पुढील सहा महिन्यांसाठी हंगामी स्वरूपात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासकीय आराखडा अंतिम झालेला नसतानाही २००८ मध्ये संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना त्याच पदावर सुधारीत वेतनश्रेणीसह कायम करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पीएमपीतील राष्ट्रवादी कामगार युनियनने सातत्याने पाठपुरावा केला. मुंढे यांची नियुक्ती पीएमपीमध्ये झाल्यानंतरही त्यांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार मुंढे यांनी सर्व तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मुळ पदावर निुयक्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकूण १८ कर्मचाऱ्यांपैकी शुक्रवारी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवीन आस्थापना आराखड्यानुसार निर्मिती करण्यात आलेल्या पदावर केली आहे. त्यांना पुर्वी बढती देण्यात आलेल्या पदाच्या वेतनश्रेणीऐवजी नवीन पदाची वेतनश्रेणी दिली जाईल.
पदोन्नती रद्द करण्यात आलेले कर्मचारी व सुधारित पद (कंसात २००७ मध्ये पदोन्नतीने मिळालेले पद) : प्रशांत कोळेकर - लिपिक (कनिष्ठ अभियंता - विद्युत), विक्रम शितोळे - वाहतुक निरीक्षक (पास विभाग प्रमुख), शिरीष कालेकर - हेड मेकॅनिक (व्यवस्थापकांचे स्वीय सहायक), असिफ अब्बास झारी - लिपिक (अध्यक्षांचे स्वीय सहायक), दत्तात्रय तुळपुळे - लिपिक (कनिष्ठ अभियंता - स्थापत्य), नितीन वांबुरे - लिपिक (स्वच्छता विभागप्रमुख), शांताराम वाघेरे - पुणे स्टेशन आगार कार्यालय अधिक्षक (स्वीय सहायक संचालक मंडळ), अरूण थोपटे - स्थापत्य पर्यवेक्षक (मेंटनन्स सुपरवायझर), मधुकर गायकवाड - मराठी लघुलेखक (मराठी स्टेनोग्राफर), बापु मोरे - टेलिफोन विभागप्रमुख (वरिष्ठ लिपिक)