PMPML | पीएमपीचे ग्रामीण भागातील २३ मार्ग बंद; आणखी ४० मार्ग बंद करण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:12 AM2022-12-05T11:12:50+5:302022-12-05T11:13:06+5:30
एसटी संपाच्या काळात पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली होती....
पुणे : पीएमपी प्रशासनाने शहराबाहेरील ग्रामीण मार्गावरील ११ मार्गांसह निगडी-लोणावळ्याचा बारावा मार्गसुद्धा नुकताच बंद केला आहे. त्यासोबतच आणखी ४० मार्ग बंद करण्याचे नियोजन केले आहे. एसटी संपाच्या काळात पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली होती. मात्र, संप संपला तरी पीएमपीने ग्रामीण भागातील आपली सेवा बंद केली नाही. यामुळे शहरात नागरिकांना मुबलक सेवा देण्यास पीएमपीला अडचणी येत होत्या.
पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ग्रामीण भागातील पीएमपीच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील सेवा आता बंद होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ११ मार्ग बंद करण्याचे नियोजन होते. त्यात पीएमपीने आणखी एक मार्गाची भर टाकल्याने ग्रामीण भागातील १२ मार्ग बंद केले आहेत. बारावा मार्ग निगडी-लोणावळा हा आहे.
नियमानुसार, पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरापुरतीच मर्यादित आहे. एसटी राज्यभर सेवा पुरवत असताना, पीएमपीला महापालिका हद्दीबाहेर बससेवा सुरू करायची असेल, तर एसटीची परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु, पीएमपीने ग्रामीण मार्ग सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसला आहे.
ग्रामीण भागातील बंद झालेले १२ मार्ग…
१) स्वारगेट ते काशिंगगाव
२) स्वारगेट ते बेलावडे
३) कापूरव्होळ ते सासवड
४) कात्रज सर्पोद्यान ते विंझर
५) सासवड ते उरुळीकांचन
६) हडपसर ते मोरगाव
७) हडपसर ते जेजुरी
८) मार्केटयार्ड ते खारावडे/लव्हार्डे
९) वाघोली ते राहुगाव, पारगाव सालू मालू
१०) चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर
११) सासवड ते यवत
१२) निगडी ते लोणावळा
नव्याने बंद केलेले ११ मार्ग..
१) भोसरी ते पाबळ
२) कात्रज ते वडगाव मावळ (मार्ग क्र. १)
३) कात्रज ते वडगाव मावळ (मार्ग क्र. २)
४) शिक्रापूर एसटी स्टँड ते न्हावरे
५) हडपसर ते रामदरा लोणी काळभोर
६) भेकराईनगर ते तळेगाव ढमढेरे
७) वाघोली ते रांजणगाव सांडस
८) हिंजवडी, शिवाजी चौक ते घोटावडे फाटा
९) पुणे स्टेशन ते पौड एसटी स्टँड (मार्ग क्र. १)
१०) पुणे स्टेशन ते पौड एसटी स्टँड (मार्ग क्र. २)
११) एनडीए गेट नं. १० ते सिम्बॉयोसिस