पीएमपीची विमानतळ बससेवा ६ नव्हे एकाच मार्गावर; अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने ५ मार्गांवर बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:12 IST2024-12-04T15:11:21+5:302024-12-04T15:12:36+5:30
लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर सुरु करण्यात आलेली एसी ई-बस अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्यात आली

पीएमपीची विमानतळ बससेवा ६ नव्हे एकाच मार्गावर; अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने ५ मार्गांवर बंद
उजमा शेख
पुणे: पीएमपीची अभी (एअरपोर्ट बस फॉर बिझनेस अँड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) विमानतळ बस सेवा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. ही बस सहा मार्गांवर सुरू होती. त्यासाठी नियमित दरात तिकीट आकारणी, तसेच सर्व थांबे असतानाही प्रशासनाला अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याने सहा मार्गांवरच्या बससेवा पीएमपी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या आहेत.
लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर एसी ई-बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करण्यात आली होती. अभी एअरपोर्ट बससेवेचे मार्ग हे बिझनेस व हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून तयार केला असल्याने या बससेवेसाठी आधी विशेष तिकीटदर आकारण्यात येत होते. हे दर जास्त असल्यामुळे प्रवाशांना ते परवडत नव्हते. ही बाब लक्षात येताच विमानतळ बससेवेची प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी तिकीट दरांमध्ये फेररचना करून नियमित बससेवेच्या दरात प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला; परंतु तरीही या मार्गावर अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व ६ मार्गांवरील विमानतळ बससेवा बंद करण्यात आली आहे.
या मार्गावर विमानतळ बससेवा होत्या सुरू
- लोहगाव विमानतळ ते हिंजवडी, माण फेज ३ शिवाजी चौक, पुणे विद्यापीठ गेट, मनपा भवन, पुणे स्टेशनमार्गे
- विमानतळ ते भेकराईनगर (हडपसर) - हडपसर गाडीतळ, मगरपट्टा, खराडी बायपास चौक, हयात हॉटेल
- विमानतळ ते निगडी - चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, लांडेवाडी कॉर्नर, भोसरी, मॅगझीन चौक, विश्रांतवाडी
- विमानतळ ते स्वास्गेट - पूलगेट, वेस्ट एंड टॉकीज, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, शास्त्रीनगर चौक
- विमानतळ ते निगडी- चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, शास्त्रीनगर रोड, हयात हॉटेल
- विमानतळ ते कोथरूड स्टॅण्ड - गुडलक चौक, लोकमंगल, मनपा भवन, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, गोल्फ क्लब
नोव्हेंबर महिन्यातील उत्पन्न : १५९०५५
प्रवासी संख्या - १४,०५०
बस संख्या - २ (ई बस)
फेरी - प्रत्येकी ४० मिनिटांनी
प्रवाशांसाठी नियमितच्या तिकीट दरात विमानतळ बससेवा ६ मार्गावर सुरू करण्यात आले होते; परंतु या सेवेमधून अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या सहाही मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक.