सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:56 PM2020-02-21T20:56:47+5:302020-02-21T20:58:01+5:30
सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीच्या उत्पन्नात माेठ्याप्रमाणावर घट हाेते. त्यासाठी पीएमपीने नवी याेजना आखली आहे.
पुणे : सुट्टीच्या दिवशी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कमी उत्पन्न मिळते. आता राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन सुट्टयांची भर पडल्याने पीएमपीचे उत्पन्न आणखी कमी होणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सिंहगड, केतकावळे, देहू, आळंदी, सासवड यांसह विविध लांबपल्याच्या मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये ५० हून अधिक मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.
‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न जवळपास १ कोटी ६० लाख रुपये एवढे आहे. पण सुट्टीच्या दिवशी त्यामध्ये ३० ते ३५ लाख रुपयांची घट होते. यापुर्वी दर महिन्यातील प्रत्येक रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच सण-उत्सवाच्या सुट्यांमुळे पीएमपीला कमी उत्पन्न मिळत होते. त्यातच आता राज्य शासनाच्या कार्यालयांना पाचच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. दि. २९ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार आहे. याचा फटका पीएमपीला बसणार आहे. दि. १६ ते २२ फेब्रुवारी या आठवड्याचा विचार केल्यास १६ तारखेला रविवार, १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २१ तारखेला महाशिवरात्री आणि २२ तारखेला चौथा शनिवार अशा चार सुट्टया आल्या आहेत. या सुट्यांमुळे पीएमपीला आठवड्यात तब्बल सव्वा कोटी रुपये उत्पन्न कमी मिळणार आहे.
आधीच पीएमपीची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सुट्टयांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. ही तुट भरून काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे तसेच अन्य लांबपल्याच्या मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे ५० हून अधिक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सिंहगड, केतकावळे, सासवड, तळेगाव ढमढेरे, उरुळीकांचन, तळेगाव दाभाडे, देहू, आळंदी आदी मार्गावर दररोजचे बसेस व्यतिरिक्त जादा बसेस देऊन उत्पन्न वाढीसाठी नियोजन करण्यात आले आहे. अशा सर्व मार्गावर फक्त सुट्टीत तीन ते चार बसेस जादा अशा एकत्रित १०० ते १५० बसेस जादा सोडण्यात येणार आहेत.
सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळी साेडण्यात येणार जादा बसेस
सुट्टीच्या दिवशी पीएमपीच्या बस सकाळी नियमित वेळापत्रकानुसार धावतात. पण प्रवासी मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यादिवशी अनेक जण लांब पल्ल्याच्या प्रवासाचे दुपारनंतर नियोजन करतात. त्यासाठी सकाळच्या सत्रातील बस कमी करून दुपारनंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर नियमित बससह जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी