पीएमपीएमएलचा ब्रेक फेल; दोन महिन्यात दुसरा मोठा अपघात, प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:41 PM2018-01-11T18:41:53+5:302018-01-11T18:46:22+5:30

अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

PMPML break fail; second big accident in Two months, the administration apathetic | पीएमपीएमएलचा ब्रेक फेल; दोन महिन्यात दुसरा मोठा अपघात, प्रशासन उदासीन

पीएमपीएमएलचा ब्रेक फेल; दोन महिन्यात दुसरा मोठा अपघात, प्रशासन उदासीन

Next
ठळक मुद्देचालक हनुमंत झालटे यांनी गाडी डॉल्फिन चौकाला धडकवली, त्यामुळे टळली जीवितहानीअप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे का काढली जात नाहीत?, नागरिकांचा सवाल

बिबवेवाडी : अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
६ नोंव्हेबर रोजी याच ठिकाणी झालेल्या सात वाहनाच्या विचित्र अपघातात एक जणाला आपले प्राण गमावावे लागले होते तर एक व्यक्ती गंभीर जख्मी झाला होता. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा विषय अनेक दिवस चर्चिला देखील गेला. महापौर मुक्ता टिळक यांनी येथील नगरसेवकासह येथील पाहणी दौरा देखील केला व येथील अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. मात्र येथील अतिक्रमणे जशीच्या तशी आहेत. आज घडलेल्या घटनेत पीएमपी चालक हनुमंत झालटे यांनी आपल्या कौशल्याने गाडी डॉल्फिन चौकाला धडकवली, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते.
दुपारी ३.५० च्या सुमारास १० प्रवासी घेऊन ही स्वारगेट डेपोची बस (क्रमांक एम एफ १२ एफ सी ९४७६) खंडोबा मंदिर येथून शिवाजी नगरला चालली होती. अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावर वळताच तीव्र उतारावर ज्या ठिकाणी ६ नोंव्हेबरचा भीषण अपघात झाला होता, त्याच ठिकाणी बसचा ब्रेक निकामी झाला. बसचा हँण्ड ब्रेक दोरीने बांधून ठेवलेला होता. म्हणजेच तो ही निकामी होता. त्यामुळे चालकाने जोरात ओरडत रस्त्यावरील नागरिक व वाहनांना दूर केले व गाडी डॉल्फीन चौकावर नेऊन आदळली. या अपघातामध्ये चालक हनुमंत झालटे जखमी झाले असून गाडीतील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.

खिळखिळ्या गाड्या किती प्रवाशांचा जीव गेल्यावर बदलणार?
या अपघातामुळे पीएमपीच्या या खिळखिळ्या झालेल्या गाड्या किती प्रवाशांचा जीव गेल्यावर बदलल्या जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे का काढली जात नाहीत, हा देखील प्रश्न येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. मताच्या राजकारणासाठी अतिक्रमणांवर कारवाई न करणे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांनी पीएमपीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले. अप्पर भागामध्ये नवीन बस देण्याची मागणी देखील त्यांनी या पूर्वीच प्रशासनाकडे केलेली आहे.
अप्पर-बिबवेवाडी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा रस्ता आहे. सहकारनगर वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या अपघातग्रस्त भागामध्ये कधीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नसतो. त्यामुळे देखील अनेक अपघातांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: PMPML break fail; second big accident in Two months, the administration apathetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.