येरवडा मेट्रो स्थानकातून पीएमपीएमएल थेट विमानतळावर; फिडर सेवा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:51 AM2023-12-12T10:51:38+5:302023-12-12T10:52:02+5:30
मेट्रोतून येणारे प्रवासी येरवडा स्थानकावर उतरले, तर त्यांना स्थानकातून उतरणे सोपे व्हावे, यासाठी म्हणून तीन प्रकारची सेवा देण्यात आली आहे
पुणे : रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील येरवडा या महत्त्वाच्या स्थानक प्रवाशांची, तसेच वाहनांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रचना करून बांधण्यात येत आहे. या स्थानकावरून थेट विमानतळाकडे जाण्यासाठी म्हणून पीएमपीएल खास फिडर सेवा देणार आहे. त्यासाठी खास दोन बस-बे तयार करण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी लिफ्ट, सरकते जिने व साधे जिने अशी तिहेरी सुविधा देण्यात येणार आहे.
महामेट्रोच्या वतीने ही रुबी हॉल ते रामवाडी हा महामेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्गावरचा अखेरचा टप्पा आता सुरू व्हायचा आहे. त्यासाठीची सर्व कामे पूर्ण होत आली आहेत. या मार्गावरचे येरवडा हे महत्त्वाचे मेट्रो स्थानक आहे. या रस्त्यावर कायम वाहनांची कोंडी होत असते. मेट्रोतून येणारे प्रवासी येरवडा स्थानकावर उतरले, तर त्यांना स्थानकातून उतरणे सोपे व्हावे, यासाठी म्हणून तीन प्रकारची सेवा देण्यात आली आहे.
दाेन स्वतंत्र बस-बेची याेजना
येरवडा स्थानकापासून पुणे विमानतळ ४.८ किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मेट्रोला मिळणार आहे. त्यामुळेच पीएमपीएल प्रशासनाबरोबर चर्चा करून महामेट्रोने विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी फिडर सेवा ठेवली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र बस-बे असतील. तिथून प्रवाशांना विमानतळावर जाण्यासाठी त्वरित बस मिळेल. या स्थानकापासून दुसऱ्या बाजूला महापालिकेचा जागा आहे. तिथे हे बस-बे असतील.
महापालिका तसेच वाहतूकतज्ज्ञांबरोबर चर्चा करून येरवडा स्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच काम सुरू होईल. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे उर्वरित काम पूर्ण झाले आहे. स्थानकांची काही कामे शिल्लक असून, तीही लवकर करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग लवकरच सुरू होईल.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो