PMPML | फुकट्यांना पाचशेचा दंड! विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 02:03 PM2023-02-18T14:03:02+5:302023-02-18T14:05:02+5:30
कॅब खरेदीचा निर्णय अखेर मागे...
पुणे : पीएमपीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा प्रवाशांवर पीएमपीच्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. यात विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास ३०० रुपयांचा दंड आकारला जात होता, परंतु आता दंडाच्या रकमेत पीएमपी प्रशासनाने वाढ करत ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. पीएमपीत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे प्रशासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो, याचा विचार करून ३०० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांनीही पीएमपीतून प्रवास करताना ५०० रुपयांचे नुकसान करण्याऐवजी नियमित तिकिटाचे पैसे देऊन प्रवास करणे गरजेचे आहे.
कॅब खरेदीचा निर्णय अखेर मागे
पीएमपीएमएलकडून इलेक्ट्रिक कॅब खरेदी करून त्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आले. पीएमपी प्रशासनाने हा निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरांवर याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. कॅब चालकांसह काही रिक्षा चालकांनीही या निर्णयाला विरोध केला होता. अखेर विविध मुद्द्यांचा विचार करून, हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.